
हिंदुस्थानी महिला क्रिकेटसाठी उद्या रविवारचा दिवस खऱया अर्थाने संस्मरणीय ठरणार आहे. कारण 19 वर्षांखालील मुलींच्या पहिल्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील जगज्जेतेपदाच्या झळाळत्या करंडकावर नाव कोरण्यासाठी हिंदुस्थानला केवळ विजयाची गरज आहे. मात्र, रविवारी होणाऱया या किताबी लढतीत हिंदुस्थानच्या मार्गात बलाढय़ इंग्लंडचा अडथळा आहे.
19 वर्षांखालील युवतींची पहिली टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत सुरू असून पोचेफस्ट्रूमच्या मैदानावर उद्या सायंकाळी हिंदुस्थान-इंग्लंडदरम्यान अंतिम लढत रंगणार आहे. याच मैदानावर हिंदुस्थानी मुलींनी उपांत्य लढतीत न्यूझीलंडवर 8 गडी राखून दणदणीत विजय मिळविला होता. मात्र, जेतेपदाच्या लढतीत स्पर्धेत अजेय असलेल्या इंग्लंडबरोबर हिंदुस्थानची गाठ पडणार आहे. इंग्लंडच्या मुलींनी ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज, आयर्लंड, रवांडा, पाकिस्तान व झिम्बाब्वे या संघांना पराभूत करून अंतिम फेरी गाठली आहे. हिंदुस्थानला आतापर्यंत झालेल्या सहापैकी एका लढतीत ऑस्ट्रेलियाकडून हार पत्करावी लागली होती. त्यांनी न्यूझीलंड, श्रीलंका, स्कॉटलंड, यूएई व यजमान दक्षिण आफ्रिका या संघांचा पराभव करीत अंतिम फेरीत धडक दिली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला हरविणाऱया इंग्लंडचे अंतिम लढतीत हिंदुस्थानसमोर कडवे आव्हान असेल. कर्णधार शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने अंतिम फेरीत धडक मारण्याचा पराक्रम केला आहे. या स्पर्धेत श्वेता सेहरावतने सर्वाधिक 292 धावा फटकावल्या आहेत.
आज अंतिम लढत
हिंदुस्थान-इंग्लंड, पोचेफस्ट्रूम
थेट प्रक्षेपण सायंकाळी 5:15 वाजता



























































