उन्हवरे खाडी गाळाने भरल्याने भात शेतीचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गरम पाण्याचा कुंड म्हणून सुप्रसिध्द असलेले दापोली तालुक्यातील उन्हवरे येथील कुंडा नजिकच्या खाडीत गाळ साचत आहे. त्यामुळे खाडीतील पाणी लगतच्या शेतात घुसू लागल्याने भात पिकावर त्याचा परिणाम झाला आहे. शिवाय गरम पाण्याच्या कुंडामध्ये खारे पाणी शिरल्याने कुंडातील पाणीही खराब होत आहे.

याबाबत स्थानिक ग्राम पंचायतीने तसेच वेळोवेळी वृत्तपत्रांतून आवाज उठवूनही या समस्येकडे प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही, त्यामुळे तीन आंबा ते भोयाचे बंदर या पट्ट्यातील भातशेतीचे प्रतिवर्षी नुकसान होत आहे. एकीकडे काळा तांदूळ, लाल तांदूळ भातशेतीचे कौतुक केले जात आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांना अशा समस्यांमुळे नाईलाजास्तव शेती सोडून द्यावी लागते आहे, हे दुर्दैव असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.

शेतकरी खाडी शेजारील खारवट जमिनीत भातशेती करत होते. त्यामुळे उन्हवरे,वावघर,फरारे येथील अनेकांना शेतीकामातून मजुरीचे साधन उपलब्ध होत होते. मात्र या खाडीत गाळ साचल्याने खाडीचे पाणी भातशेतीत घुसू लागल्याने त्याचा परिणाम हा भात उत्पादनावर झाला आणि शेती करणे सोडून द्यावे लागले, त्यामुळे खाडी लगतची शेती ओस पडली आहे.

या संदर्भात ग्रामपंचायतीने संबंधित विभागाकडे तसेच वृत्तपत्रांनी खाडीचा गाळ काढण्यात यावा या संदर्भात आवाज उठवला मात्र आजही जैसे थे अशीच परिस्थिती आहे.

पूर्वी या भागातील लोक खाडीतील गाळ काढून त्यातील रेती बांधकामांना वापरत होते. त्यामुळे गाळाने भरलेली खाडी थोड्याफार प्रमाणात रिकामी होत होती.मात्र त्या नंतर शासनाच्या निर्बंधांमुळे खाडीतील उत्खनन बंद पडले आणि गाळ साचत गेला.

उन्हवरे बाजारपेठमधील किराणा मालाचे व्यापारी हे दाभोळ तसेच चिपळूण येथून किराणा सामान मचव्याने आणत असत. त्याचप्रमाणे सुक्या मासळीचा व्यवसाय देखील होड्यांद्वारे होत असे. मात्र ही खाडी गाळाने भरत गेली आणि होड्या येणे बंद झाले.