
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जनजीवन ठप्प झाले होते. आता परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया राबवण्यात येत आहे. देशभरात अनलॉक 3 काळात वाहतूकीला परवानगी मिळाल्याने उद्योगधंदे सुरू होत आहेत. आता देसभरात 1 सप्टेंबरपासून अनलॉक 4 लागू होणार आहे. या अनलॉक 4 मध्ये केंद्र सरकार मेट्रो रेल्वे सेवा सुरू करण्यास परवानगी देण्याची शक्यता आहे. मात्र, शाळा, महाविद्यालये आणि चित्रपटगृहे बंद राहण्याची शक्यता आहे. या आठवड्याच्या अखेरीपर्यंत अनलॉक 4 ची नियमावली जारी होण्याची शक्यता आहे.
अनलॉक 4 मध्ये केंद्र सरकार मेट्रो रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी परवानगी देण्याची शक्यता आहे. मात्र, राज्यातील कोरोना फैलावाची स्थिती लक्षात घेत, यावर अंतिम निर्णय राज्य सरकार घेणार आहे. कोरोनाची स्थिती बघता शाळा महाविद्यालये बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र, विद्यापीठे,आयआयटी, आयआयएम सुरू करण्याबाबत विचार करण्यात येत आहे. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. तसेच आतापर्यंत बंद असलेले बारही सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे. सद्य परिस्थितीचा विचार करता चित्रपटगृहे सुरू करणे मोठे आव्हान ठरणार आहे. चित्रपटगृहात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे कठीण होणार असल्याने अनलॉक 4 मध्ये त्यांना परवानगी मिळण्याची शक्यता नाही.
अनलॉक 4 च्या नियमावलीत फक्त प्रतिबंधीत बाबींचाच उल्लेख करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यात नमूद असलेल्या बाबी वगळता इतर गोष्टींना परवानगी असेल, असे सांगण्यात आले. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय राज्य सरकार कोरोना फैलावाच्या परिस्थितीनुसार घेणार आहे. लॉकडाऊन लागू झाल्यापासून मेट्रो रेल्वे, चित्रपटगृहे, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, बार, मंदिरे, सभा, संमेलने बंद आहेत. आता अनलॉक 4 मध्ये कोणत्या गोष्टींना परवानगी मिळणार ते या आठवड्याच्या अखेरीपर्यंत स्पष्ट होणार आहे.


























































