उत्तर प्रदेशात मिरवणुकांवर बंदी, 30 सप्टेंबरपर्यंतची सर्व आयोजनांवर बंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
yogi adityanath

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आगामी उत्सवांसंदर्भात पोलीस-प्रशासनासोबत बैठक घेऊन आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच सार्वजनिक समारंभ, धार्मिक उत्सव, राजकीय कार्यक्रम आणि मेळाव्यावर 30 सप्टेंबरपर्यंत पूर्णपणे बंदी घातली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार मूर्ती सार्वजनिक ठिकाणी बसवल्या जाणार नाहीत किंवा ताजिया काढल्या जाणार नाहीत, असेही या आदेशात म्हटले आहे. गणेशोत्सव (अनंत चतुर्दशी) आणि मोहरम लक्षात घेत योगी सरकारने हा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री योगी यांनी मंगळवारी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत म्हटले आहे की, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना सार्वजनिकरित्या परवानगी देता येणार नाही आणि या सूचनांचे कठोर पालन झाले पाहिजे.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग दरम्यान मुख्यमंत्री योगी यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, जर कुणी नियमांचे उल्लंघन करतांना आढळले तर त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. तसेच सोशल मीडियावर बारीक नजर ठेवण्यास सांगण्यात आले असून अफवांबाबत जागरुक राहण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

विशेष म्हणजे मोहरमच्या मिरवणुकीसंदर्भात यावेळी बरेच वाद झाले आहेत. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौसह संपूर्ण राज्यात मोहरमच्या निमित्ताने ताजिया काढला जातो, परंतु कोरोना विषाणूच्या मार्गदर्शक सूचनांमुळे त्यास परवानगी नाही.

हे प्रकरण सर्वोच्च न्यायालतही पोहोचले पण तिथूनही कोणताही दिलासा मिळाला नाही. कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करून केवळ 5 लोकांना मोहरमची मिरवणूक काढण्यास परवानगी देण्यात यावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. मंगळवारी कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. मात्र, या खटल्याची पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे.