मैत्रिणीशी बोलण्यावरून वाद, पाचव्या मुलानं त्रिशुळानं केली वडिलांची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशातील औरैया विभागात एक भयंकर घटना समोर आली आहे. इथे एका मुलानं आपल्या वडिलांची हत्या केली आहे. कारण ऐकून तर कुणालाही धक्का बसेल. मैत्रिणीसोबत बोलल्यावरून टोकल्याने त्याने रागाच्याभरात वडिलांची हत्या केली. त्यानंतर तो फरार झाला.

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार मैत्रिणीसोबत बोलण्यावरून वडील आणि मुलामध्ये अनेकदा वादावादी व्हायची. त्यामुळे दोघांमधील संबंधात दिवसेंदिवस तणाव वाढत गेला होता. यावरून नात्यांमध्ये दूरावा निर्माण झाला होता. त्यातूनच संतापलेल्या मुलानं वडिलांची हत्या केली. सध्या मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे आणि फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे.

औरैयाच्या अजीतमल पोलीस ठाण्याअंतर्गत भीखेपुर विभाग आहे. इथे अरविंद कुमार आपल्या कुटुंबासह राहत होते. त्यांच्या कुटुंबात 10 मुलगे आणि एक मुलगी आहे. मोठा मुलगा आणि मोठ्या मुलीचं लग्न झालं आहे. 5 क्रमांकाच्या मुलाचं एका मुलीवर प्रेम होतं. मात्र वडील याच्या विरोधात होते. त्यामुळे त्यांच्यात खटके उडत होते. तो मैत्रिणीला भेटायला जायचा आणि रोज बऱ्याच उशिरा घरी परतायचा. यामुळे त्याचे वडील त्याच्यावर संतापायचे. अखेर एकदिवस मुलानं त्रिशूळ मारून वडिलांची हत्या केली.

अरविंद यांच्या मुलानं घराजवळच्या मंदिरातून त्रिशूळ घेत हल्ला करताच त्यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. कुटुंबातील अन्य सदस्य धावत आले तोपर्यंत ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. मात्र रक्तस्राव मोठ्याप्रमाणावर झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. लवकरच तो तुरुंगात असेल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.