
सामना प्रतिनिधी । ठाणे
कला…सांस्कृतिक…क्रीडा…खाद्यजत्रा आदींचे ‘तरंग’ विहंग संस्कृती आर्ट फेस्टिव्हलच्या निमित्ताने उपवन तलावाकाठी 11 ते 14 जानेवारीदरम्यान उमटणार आहेत. या चार दिवसीय सांस्कृतिक मेजवानीमध्ये देशभरातून विविध कलाकार हजेरी लावणार असून विविध शाळांच्या दोन हजार विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत या फेस्टिव्हलचे येत्या शुक्रवारी, 11 जानेवारी रोजी दिमाखदार उद्घाटन होणार आहे. त्यामुळे संगीत, चित्रकला, शिल्पकला, नृत्य आदींचा अनोखा मिलाप रसिकांना अनुभकता येणार असून विविध क्षेत्रांतील मान्यकरांसह रसिकांच्या मांदियाळीने उपवन तलावानजीकचा परिसर गजबजून जाणार आहे.
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नाने व ठाणे पालिका, एमआयडीसी, नारेडको, एमसीएचआय यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱया विहंग संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचे यंदा पाचवे वर्ष आहे. त्यासाठी उपवन तलाव परिसरात तयारी अंतिम टप्प्यात आली असून येथे जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध कलाकृती मांडण्यात आल्या आहेत. यासोबतच गायक, संगीतकार दर्शन रावल, मित ब्रोज, गझल गायक जसविंदर सिंग आणि इंडो – किकी गायिका शर्ले सेठिया आदींचे अनुक्रमे चार दिवस ‘लाईव्ह कॉन्सर्ट’ उपवन तलावामागील मैदानात रंगणार आहेत. तर उपवन तलावातील ‘तरंगत्या रंगमंचा’वर तबलावादक पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर, पद्मभूषण डॉ. सरोजा वैद्यनाथ, पद्मभूषण व्ही. पी. धनंजयन आणि शांता धनंजयन, महाराष्ट्र गौरव पुरस्कार विजेते दीपक मजूमदार आदींचे कार्यक्रम रंगणार असल्याची माहिती आयोजक प्रताप सरनाईक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक राजन बांदेलकर, मनोज पिल्लई, सुमन विजयकर, जितेंद्र मेहता, अरुणकुमार सुवर्णा आणि उन्नत्ती बांदेलकर उपस्थित होते.
मार्शल आर्टस्चा पंगा
यंदा प्रथमच फेस्टिव्हलमध्ये ‘इंडिया ओपन मार्शल आर्टस्’ स्पर्धा रंगणार असून हिंदुस्थानातील 150 फायटर्स एकमेकांना भिडणार आहेत. तर यंदाचा शिवगौरव पुरस्कार प्रसिद्ध अणु वैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर यांना फेस्टिव्हलदरम्यान दिला जाणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
























































