
>> मंगेश उदगीरकर
आयुष्यातल्या अनोख्या अनुभवांसारखी वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेली माणसं मनाच्या कप्प्यात अलगद विसावतात. अल्पकाळ वेडावणारी तर कधी दीर्घकाळ रेंगाळणारी, पण मनाच्या अंगणात त्यांच्यातली अपूर्वाई तशीच राहते. हे तरल अस्तर उलगडताना भेटलेल्या अवलियांविषयी.
बँकेच्या वसुलीसाठी फिरत असताना एका झोपडपट्टीत शिरलो. माणसं अशिक्षित असली तरी प्रामाणिक होती. तिथे फिरत असताना आवाज आला,
‘‘काका, हिकडं कुट?’’
वळून पहिलं तर समोर एक हसऱया चेहऱयानं एक तरुणी उभी! ‘‘आपण?’’
‘‘वळीखलं नाय का?’’ मी गोंधळात पडलो.
‘‘म्या रादाबाईची अंजू!’’
‘‘राधाबाई म्हणजे…’’ मला लिंक लागेना!
‘‘अवो, तुमच्या बिल्डिंगीवर पानी घालनाऱया!’’ ती खुदुखुदु हसत बोलली. माझ्या डोक्यात भक्कन प्रकाश पडला!
‘‘राधाक्काची अंजू?’’ आठवलं! सगळंच लक्ख आठवलं! माझं पहिलं घर, पायाभरणीपासून फुटाफुटानं वर येणारं ते घर, भिंतीवर येईपर्यंत आम्ही नवराबायको पाळीपाळीनं हपसून पाणी टाकत होतो, पण भिंती उंचावर गेल्या आणि ते अशक्य होऊन बसले, तेव्हा मिस्त्र्ााrने सांगितलं, ‘‘पानी मारने को लेबर लगाना जरुरी है!’’ आणि आमच्या घरात राधाबाईंचे आगमन झाले. म्हातारी थकल्यासारखी वाटत असली तरी काटक होती, चपळ होती. डोक्यावर कापूस पिंजून ठेवल्यासारखे केस, चांदी भरलेल्या भुवया, पाणीदार मोठे डोळे, डोक्यावर पदर घेतलेली लहानखुरी मूर्ती. या वयातही तिला काम करताना पाहून आम्हा दोघांना कसेतरी वाटायचे. आम्ही दोघेही तिचा भार हलका करायचा प्रयत्न करायचो. राधाबाई बोलकी होती. हळूहळू ती आमच्या घरातलीच एक होऊन गेली. यथावकाश घर बांधून झाले. पण तरी आम्ही तिला ठेवून घेतले. तिच्या सोबत एक छोटी मुलगी असायची. पाचसहा वर्षांची ही मुलगी मोठी गोड होती. गोबऱया गालाची, नकटय़ा नाकाची, घरभर पळायची.
‘‘राधाबाई! तुमची नात दमवून टाकते मला!’’ मी एके दिवशी सहज म्हटलं.
‘‘नात नव्हं, लेक हाय माजी!’’ आम्हाला धक्काच बसला. नंतर कळलं, व्यसनाधीन नवऱयानं तिच्या झोळीत ही पोरगी टाकून जगाचा निरोप घेतला होता. तेव्हापासून राधाबाई आम्हाला जास्तच जवळची होऊन गेली. तिची पोरगी तर माझ्या कडेवरच असायची. तिचं नाव अंजू.
असे बरेच दिवस गेले आणि अचानक राधाबाई, अंजू येईनाशा झाल्या. आज येतील, उद्या येतील म्हणून आम्ही वाट बघितली, पण त्या आल्याच नाहीत. अखेर मी त्यांच्या खोपटाकडे गेलो, तर कुलूप! शेजारी चौकशी केली तर कळले, त्यांचा भाऊ आला होता आणि त्याने या मायलेकीला आपल्या घरी नेलं. आम्हाला बरं वाटलं, चला! राधाबाईचं बस्तान बसलं एकदाचं! त्यानंतर वर्षे उलटली. राधाबाईंचा आम्हाला विसर पडला आणि इतक्या वर्षांनंतर…
‘‘काका, चला ना आपल्या घरी!’’ मी भानावर आलो. मुकाट तिच्या मागे गेलो. भोवताली झुडुपांनी वेढलेल्या तिच्या खोपटासमोर आलो. स्वच्छ अंगण, चोहोबाजूंनी उतरत्या छताखाली सुबक घर होतं. तिनं दार उघडलं,
‘‘आत या ना काका!’’ मी वाकून आत शिरलो. स्वच्छ सारवलेली जमीन. एक सुरेख पलंगपोस टाकलेली कॉट, एक खुर्ची. ‘‘काका! ही आमची बैठक, मध्ये स्वयपाकघर, बस!’’ मी मध्येही डोकावून आलो.
‘‘अंजू! तुझं लग्न कधी झालं?’’ मी पहिल्यांदाच तोंड उघडलं.
‘‘एक वर्ष झालं काका!’’
‘‘जावई काय करतात आमचे?’’
‘‘ते रिक्षा चालवतात, मी चार घरची धुणीभांडी करते. छान चाललंय काका आमचं!’’
‘‘राधाबाई?’’
‘‘आई दोन वर्षांपूर्वीच गेली! माझ्या मामानं आम्हाला त्याच्या गावी नेलं. लई छळलं आम्हाला. आम्ही दोघी तिथून बाहेर पडलो. मग आम्ही दोघींनी कामं धरली. हळूहळू बस्तान बसलं, नंतर आई आजारी पडू लागली. त्यातच माझं लग्न जमलं. तिनंच जमवलं आणि यांच्या हातात माझा हात देऊन तिनं प्राण सोडला!’’ अंजूच्या डोळय़ांना धारा लागल्या होत्या.
‘‘काका, आता आल्यासारखं जेवूनच जा!’’
‘‘अगं…’’ मी संकोचून गेलो.
‘‘माझे सगळे हट्ट पुरवायचे ना तुम्ही? मग हाही पुरवा!’’
माझे बोलणेच खुंटले! तेवढय़ात बाहेरून हाक आली.
‘‘काका, हे पण आले!’’ तेवढय़ात घरात एका सावळय़ा, तरतरीत तरुणानं प्रवेश केला.
‘‘अहो! मी नेहमी तुम्हाला सांगायची ना, ते हे काका! आणि हे प्रकाश बुडगे, माझे मालक!’’
त्यानं माझ्या पायावर डोई ठेवली. आमच्या गप्पा रंगल्या. तेवढय़ात अंजूने ताटं वाढून आणली. जेवण झालं, तृप्त झालो.
‘‘येतो अंजू, प्रकाशराव!’’
‘‘आता येत जा काका!’’
आमच्या पोटाला मुलगी नाही, पण आपल्या लेकीचा भरला संसार पाहून बापाला जो आनंद होत असेल त्या आनंदाचा अनुभव मी घेत होतो. माझ्या अंगाखांद्यावर खेळलेली ही पोर एवढी मोठी झाली ही अविश्वसनीय घटना मला सुखाचा धक्का देऊन गेली होती. माझ्या सर्वसामान्य आयुष्यात अमनधपक्या जी नाती निर्माण झाली त्यातले हे श्रेष्ठ नाते होते. बापलेकीचे…माझी लेक …अंजली प्रकाश बुडगे!




























































