मुख्यमंत्री योगींकडून माझ्या हत्येचा प्रयत्न, ‘सुभासपा’च्या अध्यक्षांनी केलेल्या आरोपांमुळे खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू असून सोमवारी दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. 403 जागासाठी होत असलेल्या या निडणुकीचे दोन टप्पे (10 आणि 14 फेब्रुवारी) आतापर्यंत पार पडले आहेत. आता 20 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानावर सर्वांचे लक्ष आहे. या निवडणुकीच्या प्रचाराची रंगत वाढण्यापूर्वीच सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे अध्यक्ष ओम प्रकाश राजभर यांनी केलेल्या एका गंभीर आरोपामुळे उत्तर प्रदेशचे राजकीय वातावण ढवळून निघाले आहे.

योगी आदित्यनाथ यांचा माझी हत्या करण्याचा इरादा आहे. काल गुंड पाठवून वाराणसीमध्ये माझ्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे अध्यक्ष ओम प्रकाश राजभर यांनी केला आहे. तसेच मला आणि माझा मुलगा अरविंद राजभरला सुरक्षाव्यवस्था पुरवावी अशी मागणी ओम प्रकाश राजभर यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

वाराणसीमध्ये काय घडलं?

सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे अध्यक्ष ओम प्रकाश राजभर यांचा मुलगा अरविंद वाराणसीमधून विधानसभा निवडणूक रिंगणात उतरला आहे. काल त्याने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. हा अर्ज दाखल करताना ओम प्रकाश राजभर हे देखील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित होते. त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोर जबरदस्त घोषणाबाजी केली. प्रत्युत्तरादाखल समाजवादी पार्टी आणि सुभासपाच्या कार्यकर्त्यांनी देखील घोषणाबाजी केली. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत प्रकरण शांत केले.

भाजप कार्यकर्त्यांनी गैरवर्तन केले

जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपस्थित वकिलांनी आणि भाजप कार्यकर्त्यांनी राजभर पिता-पुत्रांना पाहताच ‘जय श्रीराम’ची नारेबाजी केली, राजभर आणि सपाच्या कार्यकर्त्यांनी ‘जय अखिलेश’ म्हणत प्रत्युत्तर दिले. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काही लोकांनी आपल्याबाबत अपशब्द वापरले आणि गैरवर्तन केले, असा आरोप राजभर यांनी केला आहे.

राजभर यांचे ट्वीट

वाराणसीतील शिवपूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. अरविंद राजभर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचलो तेव्हा भाजपचे गुंड काळे कोट घालून तिथे उपस्थित होते आणि माझ्याविरोधात, तसेच उमेदवाराविरोधात गैरवत्तन केले. तसेच मला आणि माझ्या मुलाला मारण्याचीही धमकी देत होते. जनता जशी महागाई, बेरोजकारी, शिक्षण, आरोग्य, वीज आणि अन्य मुद्द्यांवरून सपा आघाडीला मतदान करून भाजप उमेदवारांचा पळवून लावत आहे, तशी भाजपची गुंडगिरी आणि बावचाळलेपणा वाढत आहे. या गुंडावर निवडणूक आयोगाना तात्काळ कारवाई करावी, असे ट्वीट राजभर यांनी केले आहे.