इटलीच्या एका दाम्पत्याचे हिंदुस्थान प्रेम दिसून आले आहे. या दाम्पत्याने लग्नाचा चाळीसावा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. प्रेमाचे प्रतिक मानले जाणाऱ्या ताजमहालमध्ये या दाम्पत्याने सातफेरे घेऊन आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याची शपथ घेतली. त्यांचे हे लग्न चर्चेचा विषय ठरला आहे.
इटली निवासी माऊरो (70) आणि स्टेफनिया (65) यांच्या लग्नाला 40 वर्षे पूर्ण झाली. मात्र 40वा लग्नाचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यासाठी जोडप्याने 28 नोव्हेंबरला हिंदू परंपरेनुसार विवाह केला. या जोडप्याला हिंदू परंपरेनुसार लग्न करण्याची इच्छा टुर ऑपरेटरला सांगितली. त्यानंतर लग्नाची तयारी करण्यात आली होती. इटालियन जोडपे बँड वाद्यांसह ताजमहालच्या पूर्वेकडील गेटजवळील बागेत पोहोचले. वैदिक मंत्रोच्चारात जोडप्याने एकमेकांना पुष्पहार घातला. त्यानंतर विदेशी जोडप्याने अग्नीला साक्ष मानून सात फेरे घेतले, नवरदेवाने नववधूला मंगळसूत्र घातले. भांगेत कुंकू भरले. पंडित प्रवीण दत्त शर्मा यांनी मंत्रपठण केले.
हे जोडपे गेल्या पाच वर्षांपासून हिंदू परंपरेनुसार लग्न करण्याचे स्वप्न पाहत होते. माऊरो आणि स्टेफनियाच्या म्हणण्यानुसार, हिंदुस्थानात लग्न केल्यावर सात जन्माचा साथ मानला जातो. त्यामुळे या जोडप्याने हिंदुस्थानी परंपरेनुसार लग्न करण्याचा निर्णय घेतला. या लग्नाला त्याचे मित्रपरिवार उपस्थित होते. या लग्नात सर्वांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. माऊरो आणि स्टेफानियाने आनंदाने नाचलेही. हिंदुस्थानी संस्कृती संपूर्ण जगाला आकर्षित करत आहे. त्यांनी सांगितले की वधू-वरांनी पारंपारिक पोशाखात ताजमहालाला भेट दिली.