हाथरस प्रकरण छोटासा मुद्दा, भाजप मंत्र्याचे वादग्रस्त वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशमधील हाथरस सामूहिक बलात्काराप्रकरणावरून देशभरातून उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली जात आहे. मुलीवर झालेला अत्याचार, त्यानंतर मुलीचा मृतदेह कुटुंबाला न दाखवता त्याचे अंत्यसंस्कार केले. या वरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. असे असतानाच उत्तर प्रदेशचे राज्यमंत्री अजित पाल यांनी थेट या प्रकरणला एक छोटासा मुद्दा म्हटले आहे. विरोधकांकडे सध्या मुद्दा नसल्याने ते असे छोटे मुद्दे मोठे करत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य पाल यांनी केले आहे.

‘सध्या विरोधकांकडे कोणताही मुद्दा उरलेला नाही. त्यामुळे ते छोटे छोटे मुद्दे उचलत आहे. जनहीताचा कोणताही मुद्दा त्यांच्याकडे नाही. त्यामुळे आता ते हाथरस प्रकरणावर राजकारण करत आहेत. डॉक्टर बोलतात या प्रकरणात काही झालंच नाही. मग तपासात ते समोर येईलच’, असे वक्तव्य पाल यांनी केले आहे. झी न्यूजने याबाबतचे वृत्त दिले आहे.

‘आरोपींना असा दंड देईल की…’, महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांवर मुख्यमंत्री योगींची प्रतिक्रिया

 दरम्यान योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करून राज्यातील माता-भगिनींवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना इशारा दिला आहे. ‘उत्तर प्रदेशमधील माता-भगिनींच्या स्वाभिमानाला ठेस पोहोचवण्याचा विचार करणाऱ्यांचा समूळ नाश सुनिश्चित आहे. त्यांना असा दंड मिळेल की येणाऱ्या पिढ्या उदाहरण म्हणून याकडे पाहतील’, असे ट्विट करून योगींनी राज्यातील माता-भगिनींच्या सुरक्षेसाठी आणि विकासाठी राज्यसरकार कटिबद्ध असल्याचे म्हटले आहे.

देशभरात संताप
हाथरस येथे 14 सप्टेंबरला एका मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. आरोपींनी पीडितेची जीभ कापली आणि कंबरेचे हाड मोडल्याचा आरोप होत आहे. उपचारादरम्यान पीडितेचा मंगळवारी मृत्यू झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. अशातच पोलिसांनी पीडितेवर बलात्कार झाला नव्हता अशी माहिती दिली. यामुळे नवीनच वाद निर्माण झाला आहे.

राहुल गांधी यांना धक्काबुक्की
हाथरस पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी निघालेले काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी-वढेरा यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी रोखले. यादरम्यान राहुल गांधी यांना यूपी पोलिसांनी धक्काबुक्की केली. यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज देशभरात ठिकठिकाणी यूपी सरकार विरोधात आंदोलन केले.