
उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एका महिलेने हिंमत दाखवून स्वत:ला बलात्कारापासून वाचवले आहे. आरोपीने महिलेचे बळजबरीने चुंबन घेण्याचा प्रयत्न केला असता तिने तरुणाचे ओठ दाताने चावत त्याला चांगालाच धडा शिकवला. यानंतर तरुणाच्या तोंडातून रक्त वाहू लागले. त्याला वेदना होऊ लागल्या व महिलेने ही गोष्ट सर्वांच्या लक्षात यावी यासाठी आरडाओरडा केला. यानंतर आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचले आणि आरोपीला पकडून घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल केले आहे. यासोबतच पीडितेच्या तक्रारीवरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे प्रकरण उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील दारौला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील आहे. दारौला गावातील अंझोता जंगलात शनिवारी दुपारी एक तरूणी शेतात काम करत होती. तिला एकट पाहून तिथून जात असलेल्या तरूणाने तिच्यासोबत छेडछाड सुरू केली. त्याने जबरदस्तीने तरूणीचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. येवेळी या तरूणीने हिंमत दाखवत त्याचा ओठांचा दाताने जोरदार चावा घेतला आणि त्याच्या ओठाचा तुकडाच पाडला. तरुणीच्या या कृतीमुळे आरोपीला चांगलाच धडा मिळाला आहे.
दरम्यान ओठाचा तुकडा पडल्यामुळे मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव होत होता आणि तो होणाऱ्या वेदनेमुळे तो ओरडू लागला. दुसऱ्या बाजूने मुलीनेही आरडाओरडा सुरु केल्याने आजूबाजूचे लोक घटनास्थळी जमा झाले. लोकांनी आरोपी तरुणाला पकडून पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्या ओठाचा तुकडाही तिथेच पडलेला आढळून आला. पोलिसांनी तो तुकडा एका पाकिटात बंद करत जखमी तरुणाला जवळच्या रुग्णालयात नेऊन उपचार केले. या घटनेविरुद्ध तरुणीने लावड गावातील मोहित सैनीविरुद्ध बलात्कार आणि विनयभंगाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.



























































