
गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला जात असल्याने महाराजांवर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेच्या स्वाभिमानाला, अस्मितेला आणि देशातील शिवप्रेमींच्या भावनेला ठेच पोहोचत आहे. त्यावर आपण काहीच का करू शकत नाही? या विचाराने आणि महाराष्ट्रद्रोही प्रवृत्तींचा तीव्र धिक्कार करण्यासाठी स्वाभिमानी महाराष्ट्रप्रेमी नागरिक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या वढू (पुणे) येथील समाधिस्थळी उद्या (3 डिसेंबर) सकाळी 10 वाजता एकत्र येऊन ‘आत्मक्लेश’ आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात आमदार रोहित पवार उपस्थित राहणार असून, त्यामध्ये शिवप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
‘आत्मक्लेश’ आंदोलनासंदर्भात एका पत्राद्वारे आवाहन करण्यात आले आहे. ‘‘चूक ही एक वेळ होऊ शकते; परंतु वारंवार होत असेल, तर ती चूक नसते, तर जाणीवपूर्वक आणि पद्धतशीरपणे रचलेले एक षड्यंत्र असते. काही छुपे अजेंडे सेट करण्यासाठी तर हे षड्यंत्र चालविले जात नाही ना, असे या पत्रात म्हटले आहे.
























































