महाराष्ट्राच्या वैभवने पदार्पणातच संधीचे सोने केले, पारंपरिक योगासनांत मिळवले सुवर्णपदक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑरेंज सिटी नागपूरच्या मालविकापाठोपाठ योगपटू वैभव श्रीरामे आणि छकुली सेलोकर यांनी 36 वी राष्ट्रीय स्पर्धा पहिल्याच दिवशी गाजवली. नागपूरच्या या दोन योगापटूंनी महाराष्ट्राला दोन पदकांचा बहुमान मिळवून दिला. आशियाई चॅम्पियनशिप मधील सुवर्णपदक विजेता वैभव श्रीरामे पारंपरिक योगासन प्रकारात सुवर्णपदक विजेता ठरला, तर महिलांच्या पारंपरिक योगासनात नागपूरच्याच छकुली सोलेकरने रौप्य पदक पटकावले.

हलाखीच्या परिस्थितीत मेहनतीचे अफाट वैभव

नागपूर येथील वैभव श्रीरामे याची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. मात्र अशाही परिस्थितीत त्यांनी घराची जबाबदारी सांभाळत योगासनातील आपला छंद अविरतपणे जोपासला. त्याचे वडील नागपूर शहरांमध्ये इलेक्ट्रिशियनचे काम करतात. त्यामुळे त्यांना हातभार लावण्यासाठी वैभवलाही अनेकदा काम करावे लागते. अशाच प्रचंड मेहनतीचा अफाट वैभव असलेला हा योगापटू राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकाचा मानकरी ठरला.

छकुली सोलेकरची रुपेरी कामगिरी

महिलांच्या पारंपरिक योगासनात सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार मानले जाणाऱया छकुलीने सर्वोत्तम आसने करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिने महिलांच्या गटात 62.34 गुणांची कामगिरी करत रौप्य पदकाचा बहुमान पटकावला. यादरम्यान तिने सुवर्णपदकासाठी शर्थीची झुंज दिली. उपांत्य फेरीत सर्वोत्तम आसने करून तिने फायनलमध्ये प्रवेश केला. यादरम्यान ती दुसऱया स्थानावर होती. छकुलीने विभक्त विपरीत शलभासन, परिवर्त शिव लिंगरासन, वामदेव त्रिपुरासन, पैलासआसन, उर्ध्वमुख टीटीभासन ही पारंपरिक योगासने सादर केली.

‘वैभव श्रीरामे हा गुणवंत खेळाडू आहे. जिद्द आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी योगासनात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. घरच्या बेताच्या परिस्थितीवर मात करून त्यांनी योगासनातील आपली मेहनत कायम ठेवली. त्यामुळे त्याला पहिल्याच राष्ट्रीय स्पर्धेत सोनेरी पदकाचे घवघवीत यश संपादन करता आले. आगामी काळात हा खेळाडू हिंदुस्थानसाठी जागतिक स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करेल’
– संदेश खरे, मुख्य योग प्रशिक्षक