‘तनपुरे’च्या मालमत्तेचे होणार व्हॅल्युएशन, व्हॅल्यूअर नेमण्याचा नगर जिल्हा सहकारी बँकेचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

110 कोटींच्या कर्जाखाली दबलेल्या राहुरीच्या डॉ. बाबूराव तनपुरे कारखान्याच्या मालमत्तेची व्हॅल्युएशन व डय़ू डिलिजन्स करण्यासाठी जिल्हा सहकारी बँकेने व्हॅल्यूअर नेमण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी निविदा मागवण्यात आली असून, कारखान्याच्या मालमत्तेची किंमत निश्चित झाल्यावर एकतर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी देता येईल; अन्यथा कारखान्याची विक्री करण्याचा डॉ. तनपुरे कारखान्यासाठी नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकारी तथा सरव्यवस्थापक प्रशासन व ऑडिट विभागाचा विचार आहे.

गेल्या काही वर्षांपासून डॉ. तनपुरे साखर कारखान्यावर जिल्हा बँकेचे कर्ज आहे. कारखान्यासाठी घेतलेल्या कर्जाचा आकडा दरवर्षी फुगत आता 110 कोटींच्या पुढे गेला आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांत भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी हा कारखाना चालवला. तसेच, हंगामासाठी जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्जाची काही प्रमाणात परतफेडही केली. मात्र, यंदा कारखाना सुरू करण्याची शक्यता धूसर दिसत आहे. कारखाना व्यवस्थापन जिल्हा बँकेला 100 रुपये प्रतिटन गाळपावर कर्जाची वसुली देण्यास तयार आहे. मात्र, जिल्हा बँकेकडून 500 रुपये प्रती टन गाळपानुसार वसुली देण्याची मागणी करण्यात येत आहे.

अशा परिस्थितीत कारखाना सुरू न झाल्यास थकीत कर्जाच्या वसुलीसाठी आता जिल्हा बँक आणि प्राधिकृत अधिकारी तथा सरव्यवस्थापक प्रशासन व ऑडिट विभागाने कारखान्याची किंमत ठरवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी व्हॅल्यूअर नेमण्यासाठी निविदा मागवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारखान्यांच्या चल व अचल मालमत्तेचे व्हॅल्युएशन व डय़ुडिलिजन्स करण्यासाठी निविदा मागवण्यात येत आहे. ही प्रक्रिया ‘सिक्युरिटायझेशन ऍण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शिअल असेट्स ऍण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सरफेसी) ऍक्ट 2002’ अंतर्गत बँकेकडून राबवण्यात येत आहे.

कारखान्याची किंमत निश्चित झाल्यावर एकतर कारखाना आणि त्याची मालमत्ता भाडेतत्त्वावर देता येणार आहे अथवा तिची विक्री करून जिल्हा बँकेला दिलेल्या कर्जाची वसुली करता येणार आहे.

एकेकाळी वैभव असणारा कारखाना मोजतोय शेवटच्या घटका

एकेकाळी जिह्यात नव्हे, तर राज्याच्या सहकारात राहुरी कारखाना हे मोठे वैभव होते. अनेक राजकीय स्थित्यंतरे या कारखान्याने अनुभवली आहेत. राहुरी तालुक्यासह जिह्यातील ऊसउत्पादक शेतकऱयांना कारखान्याच्या माध्यमातून या कारखान्याने आर्थिक सक्षम केलेले आहे. मात्र, राहुरीचे वैभव असणारा डॉ. तनपुरे कारखाना आता शेवटच्या घटका मोजत आहे.

सांगोल्यातील राष्ट्रीय महामार्ग की म्हशींचा पाणवठा?

मिंधे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सांगोला मतदारसंघातील इंदापूर-अकलूज-जत राष्ट्रीय महामार्गावरील महूद ते सांगोला रस्त्याची सध्या प्रचंड दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्डय़ांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे जनावरांना पाणवठे शोधण्यासाठी जावे लागत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. दुष्काळी सांगोला तालुक्यातील जनतेला पाण्यासाठी भांडावे लागते. मात्र, आयतेच पाणी मिळाल्याने म्हशींनाही पाणी पिण्याचा मोह आवरता आला नाही.