वनवासमाची येथे बिबट्याच्या एका पिल्लाला मादीने नेले, दृष्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वनवासमाची येथे सोमवारी, दुपारी बिबट्यांची 3 पिल्ले आढळली होती. त्यापैकी आज पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास मादी बिबट्याच्या एका पिल्लाला घेऊन गेली. सदर प्रकार वनविभागाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यामुळे या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कराड तालुक्यातील वनवासमाची येथे स्मशानभूमी शेजारी प्रकाश यादव यांच्या शेतात ऊसतोड सुरू होती. या दरम्यान बिबट्याची 3 पिल्लं आढळली. त्यानंतर मजुरांनी ऊसतोड बंद ठेवली होती. या घटनेची माहिती कराड वनविभागास दिल्यानंतर वनअधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी शेतकरी तसेच स्थानिकांना काही सूचना दिल्या होत्या.

रेस्क्यूचे श्रीनाथ चव्हाण, हर्षद आणि डॉ. कल्याणी यांनी सर्व पिल्लांची वैद्यकीय तपासणी करून ते सुस्थितीत असल्याची खात्री केली. त्यानंतर बिबट्याची पिल्ले तेथेच एका कॅरेटमध्ये ठेवण्यात आली होती. वनविभागाने पिल्लं सापडलेल्या ठिकाणी उसाच्या रानात पुन्हा एका कॅरेटमध्ये ठेवली. पिलांचे मूत्र रानात विविध ठिकाणी मादीला पिलांचा वास यावा म्हणून शिंपडले होते. पहाटे 3 वाजता मादी येऊन एका पिलास घेऊन गेली आहे. राहिलेली दोन पिल्लं वन विभागाच्या ताब्यात सुरक्षित आणि सुस्थितीत आहेत. बिबट्याची मादी पिलांपासून ताटातूट झाल्यामुळे पिसळू नये म्हणून आज रात्री पुन्हा त्या दोन पिलांचे आईसोबत मिलन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनपाल सागर कुंभार, वनरक्षक दीपाली अवघडे, अभिजीत, स्थानिक रोहित कुलकर्णी, अजय महाडिक, योगेश शिंगण आदीच्या मदतीने बिबट्याची पिल्लांची व मादीची भेट घडवून आणण्यात आली.