
कागल तालुक्यातील सोनाळी येथील वरद पाटील या निष्पाप बालकाच्या खुन्याला फाशीचीच शिक्षा झाली. गुह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन हा खटला फास्ट ट्रक कोर्टात चालवून वरदच्या कुटुंबीयांना पोलिसांनी न्याय मिळवून द्यावा, या मागणीसाठी आज सोनाळी व सावर्डे बुद्रूक या गावांतील दोन हजारांवर महिला व ग्रामस्थांनी मुरगूड पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढला. दरम्यान, वरदच्या खुनाची कबुली दिलेल्या आरोपी दत्तात्रय उर्फ मारुती तुकाराम वैद्य याला मुरगुड पोलिसांच्या पथकाने कागलच्या न्यायालयात हजर केले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विजया काटकर यांनी त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सोनाळी येथील अपहरण करण्यात आलेल्या वरद रवींद्र पाटील या बालकाचा खून वरदच्या वडिलांचा मित्र दत्तात्रय उर्फ मारुती तुकाराम वैद्य याने केल्याचे उघडकीस आले. या घटनेने जिह्यात खळबळ उडाली होती. तर, सोनाळी व सावर्डे ग्रामस्थांत प्रचंड संताप होता. आज या संतापाचा उद्रेक झाला. सावर्डे आणि सोनाळीच्या महिला व ग्रामस्थांनी हातात निषेधाचे फलक घेऊन घोषणा देत मुरगूड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत तीन तास पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडून आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी भूमिका घेतली.
अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, करवीर उपविभागीय अधिकारी आर. आर. पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, सहायक पोलीस निरीक्षक विकास बडवे, उपनिरीक्षक किशोरकुमार खाडे आदींनी जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमाव मागणीवर ठाम होता. सोनाळीचे माजी सरपंच सत्यजित पाटील यांनी कायदा हातात न घेता आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी साक्षी-पुराव्यांनिशी पोलिसांच्या पाठीशी राहू, असे आवाहन केल्यानंतर ग्रामस्थ गावाकडे परतले.

































































