
सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली
हिंदुस्थानातून फिरकी गोलंदाजीची कला लुप्त होते की काय अशी शंका देशात अनेकदा व्यक्त केली जाते. त्या पार्श्वभूमीवर यंदाच्या आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबचे प्रतिनिधित्व करणारा युवा फिरकीवीर वरुण चक्रवर्ती फिरकीतला अवलिया ठरत असल्याचे बोलले जात आहे. पंजाबने 8.40 लाख रुपयांत खरेदी केलेला वरुण सात वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू टाकण्यात माहीर असल्याचे दिसून आले आहे. पेशाने वास्तुशास्त्रविशारद (आर्किटेक्ट) असलेला वरुण आता क्रिकेटच्या मैदानात आपली आगळी किमया दाखवू लागला आहे. वरुण उजव्या हाताने फिरकी गोलंदाजी करतो. त्याच्याकडे कॅरम बॉल, लेगब्रेक, गुगली, ऑफब्रेक, फ्लिपर, टॉप स्पिन आणि स्लायडर असे सात प्रकारचे चेंडू टाकण्याची क्षमता आहे. तामीळनाडू प्रीमिअर लीगमध्ये वरुणने 9 लढतींत 23 विकेट मिळवण्याचा पराक्रम केला आहे.
13 व्या वर्षापासून क्रिकेटशी नाते
वरुण चक्रवर्तीची पूर्वकहाणी मोठी रंजक आहे. वयाच्या 13 व्या वर्षी यष्टीरक्षक म्हणून वरुणने क्रिकेट खेळणे सुरू केले. पण वयाच्या 17व्या वर्षापर्यंत कोणत्याही संघाने त्याची दखल न घेतल्याने तो अभ्यासाकडे वळला. 5 वर्षे आर्किटेक्टचा अभ्यास करीत त्याने फ्रीलान्स वास्तुशास्त्रविशारद म्हणून करीयरही सुरू केले. पण क्रिकेटचे प्रेम त्याला मैदानापासून दूर राहू देत नव्हते. वरुणने पुन्हा क्रिकेटच्या मैदानात एक वेगवान गोलंदाज म्हणून पदार्पण केले आणि नंतर आपल्या गोलंदाजीत विविधता आणण्यासाठी तो फिरकीकडे वळला. आपल्या अफाट बुद्धीचा वापर करीत वरुणने सात वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू टाकण्याची कला आत्मसात केली. तामीळनाडू प्रीमियर क्रिकेट लीगमधील त्याचे यश पाहून किंग्स इलेव्हन पंजाबने त्याला 8.40 कोटी रुपयांत करारबद्ध केले आणि 12व्या आयपीलमधून वारुणचे मोठय़ा लीगमध्ये पदार्पण झाले.



























































