वसईत लाचखोर नायब तहसीलदार व मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

वसई तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार प्रदीप मुकणे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज लाच घेताना रंगेहाथ अटक केली. नायब तहसीलदार मुकणे आणि वसई तहसील कार्यालयाचे मंडल अधिकारी संजय सोनवणे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दीड लाख रुपये घेताना सापळा रचून पकडले. मुकणे यांच्यावर यापूर्वीही लाच घेतल्याचे अनेक आरोप करण्यात आले होते.

वसईतील गोखिवरे येथील एका जागेसंदर्भात तक्रारदार यांच्याकडे या दोघांनी दोन लाखांची लाच मागितली होती. तडजोडीअंती दीड लाख रुपये देण्याचे कबूल केल्यानंतर याबाबत तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचून मुकणे व सोनावणे या दोघांना वसईत दीड लाखाची रोख रक्कम घेताना अटक केली.