भाड्यासाठी चोरायचे रिक्षा, वसईतील गॅरेजमध्ये बदलायचे नंबर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिक्षा भाड्याने देऊन पैसे कमवण्याच्या नादात पहाटेच्या वेळेस रिक्षा चोरणाऱ्या तिघांना अंधेरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मुन्नतियाज इक्बाल शेख, खुशनूर खान आणि मेहताब अशी त्या तिघांची नावे आहेत. या टोळीने गेल्या तीन वर्षांत 70 रिक्षा चोरल्या असून त्यापैकी चोरीच्या 25-30 रिक्षा मुन्नतियाजने भाड्याने दिल्या होत्या. अंधेरी पोलिसांनी कारवाई करून चोरीच्या 38 रिक्षा जप्त केल्या आहेत.

अंधेरी परिसरात राहणारे पपू जयस्वार हे रिक्षाचालक असून पाच दिवसांपूर्वी त्याची रिक्षा अंधेरी-पुर्ला रोड परिसरातून चोरीला गेली होती. रिक्षा चोरीप्रकरणी पपू याने अंधेरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. अंधेरी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद केला. परिमंडळ-10 चे पोलीस उपायुक्त एम. रेड्डी यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक विजय बेळगे, पथकातील पोलीस निरीक्षक शिवाजी पावडे, उपनिरीक्षक दिगंबर पगार आणि पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केली. चोरी झालेली रिक्षा ही दिंडोशी परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी ती रिक्षा जप्त करून पवईच्या मिलिंदनगर येथून मुन्नतियाजला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने रिक्षा चोरीची कबुली दिली. मुन्नतियाजच्या चौकशीत खुशनूरचे नाव समोर आले. त्या दोघांना रिक्षा चोरीच्या गुन्ह्यात अटक केली. पोलिसांनी एक चोरीचा टेम्पो, 5 कटिंग रिक्षाचे सिलिंडर, रिक्षा चालू करण्यासाठी लागणारे स्वीच, इंजिन आणि चेसिस नंबर बदलण्यासाठी लागणारे साहित्य पोलिसांनी जप्त केले.