
अभय मिरजकर । लातूर
देशभरामध्ये हाच नवरा सात जन्म मिळू दे असे म्हणत स्त्रिया वटपोर्णिमा साजरी करत असतानाच लातुरात मात्र शिक्षकांनी हा सण अनोख्या पद्धतीने साजरा केला. ‘जन्मोजन्मी जिल्हा परिषदेच्या शाळा टिकवू या’, ‘सूर्य-चंद्र-तारे असेपर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळा फुलवू या‘ अशा घोषणा देत सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी आणि इतर कर्मचाऱ्यांनी वडाच्या झाडाला फेऱ्या मारल्या. वडाला संकल्पनेचा दोरा हाती घेऊन निश्चियाच्या फेऱ्या मारताना वातावरणही उत्साही झाले.
येथील जि.प.प्रशालेत वटसावित्री पोर्णिमेचे निमित्त मुख्याध्यपक भारत सातपुते यांनी आपल्या रुढी, परंपरा, सणवार या संस्कृतीतून ज्ञानाकडे जाणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या प्रशालेत पंचीम, संक्रात, वेगवेगळे उत्सव याचे औचित्य साधून पालकांचे मेळावे व स्पर्धा घेतल्या जातात. यामुळे शिक्षणाचा संदेश देण्यासाठी सोयीचे होते. जिल्हा परिषद शाळासारखे शिक्षण नाही दुसरीकडे हा संदेश विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला.

































































