
>> वृषाली पंढरी
वटपौर्णिमा हा सण म्हणजे स्त्रीने ठरविले तर अशक्य गोष्टही शक्य करू शकते हे दाखवणाऱ्या स्त्रीच्या शक्तीचे प्रतीक ठरेल. वेगवेगळय़ा नात्यांना टिकवताना, कमालीचे कौशल्य दाखवताना आजची आधुनिक स्त्री पदोपदी आपल्याला भेटते. वडिलांनी दिलेले स्वातंत्र्य, नवऱ्याने दिलेले प्रोत्साहन आणि सहकार्य यामुळे अनेक स्त्रियांनी इतिहास घडवला आहे.
हिंदुस्थानात एक काळ असा स्त्री जातीचा आदर करणारा होता. मातृसत्ताक कुटुंब पद्धती अस्तित्वात होती तेंव्हा स्त्रीचे स्थान कुटुंबप्रमुखाचे आणि महत्त्वाचे होते. जेंव्हा केव्हा अपत्य जन्माचा संबंध पुरुषाशी आहे हे लक्षात आले तेंव्हापासून पुरुषप्रधान संस्कृतीचा उगम होत स्त्रीवर, विशेषतः पत्नीवर स्वामित्व गाजवण्याची सुरुवात झाली असावी. जगभरच अनादिकालापासून पत्नीला दुय्यय वागणुकीचा सामना करावा लागला आहे व हे सर्वच धर्मात आहे. सगळी बंधने, रीतिरिवाज केवळ बायकोसाठीच, नवऱ्यासाठी का नाहीत? पतीच्या दीर्घायुष्यासाठी, आरोग्यासाठी, प्रगतीसाठी प्रार्थना करणारी करवा चौथ, हरितालिका, कोकिळाव्रत आणि वटसावित्री ही व्रते स्त्रियांनी करावयाची व पुरुषाच्या कल्याणासाठीची, विशेषतः नवऱ्याच्या कल्याणाची आहेत. जागतिक कन्या दिन, महिला दिन, मातृदिन अशा निमित्ताने स्त्रियांचे गौरव करण्याचे प्रमाण हळूहळू वाढू लागले आहे हे चांगलेच आहे, मात्र जागतिक पत्नी दिन मोठय़ा प्रमाणावर साजरा केला जातोय असे काही अजून तरी दिसत नाही. हिंदू धर्मीयांत पत्नी मृत झाल्यास तिच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘अविधवा नवमी’ हे एकमेव पतीने पत्नीसाठी करावयाचे व्रत आहे, पण तेही दुर्दैवाने पत्नीच्या मृत्यूनंतरचे आहे.
एखादे व्रत केल्याने पतीचे आयुष्य वाढते असे सिद्ध करता आलेले नाही, पण गुड मार्निंग वा गुड नाईट म्हटल्याने सकाळ किंवा रात्र चांगली गेल्याचे तरी कुठे सिद्ध करता आले आहे? तरीही आपण अशा शुभेच्छा देतोच ना? तसेच वटसावित्री व्रतावर अंधश्रद्धा म्हणून टीका करण्यापेक्षा जिद्दी, आपल्या प्रेमावर विश्वास असलेल्या पत्नीची कहाणी म्हणून ते साजरे करावे.


























































