
मुंबई महानगरातील मेट्रो सेवांपैकी सर्वात प्रथम मुंबईकरांच्या सेवेत दाखल झालेल्या वर्सोवा-घाटकोपर मेट्रोच्या प्रवासातील गर्दीचा प्रश्न नजीकच्या काळात सुटणार आहे. या मार्गावरील गर्दीचा ताण कमी करण्यासाठी सध्याच्या चार डब्यांच्या मेट्रो ट्रेनला आणखी दोन डबे जोडण्यात येणार आहेत. त्याअनुषंगाने मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने आपल्या ताफ्यात 22 डबे समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
वर्सोवा-घाटकोपरदरम्यान धावणाऱया मेट्रो मार्गिकेवर दिवसेंदिवस प्रवासी संख्या वाढत आहे. ही मार्गिका पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडण्याबरोबरच इतर मेट्रो मार्गिकांशी कनेक्ट होते. त्यामुळे प्रवाशांशी अधिक सोयीची ठरत आहे. या मार्गावरील वाढत्या प्रवासी संख्येच्या गर्दीवर उपाय म्हणून ट्रेनच्या डब्यांची संख्या वाढवण्याची मागणी जोर धरत होती. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने 22 डबे जोडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याद्वारे सध्या धावणाऱया 4 डब्यांच्या मेट्रो ट्रेनचे रूपांतर 6 डब्यांच्या ट्रेनमध्ये केले जाणार आहे. मेट्रोच्या डब्यांची खरेदी मूळ निर्मात्यांच्या तांत्रिक मदतीने सुरू केली आहे. हा प्रकल्प वेळेत पूर्ण होणे निधीच्या उपलब्धतेवर अवलंबून असेल, असे मेट्रोच्या अधिकाऱयांनी सांगितले.
मेट्रोची प्रवासी क्षमता 50 टक्क्यांनी वाढणार
मेट्रो-1 मार्गावरील ट्रेनचे डबे वाढल्यानंतर प्रवासी क्षमतेत 50 टक्क्यांनी वाढणार आहे. सध्याच्या 4 डब्यांच्या ट्रेनमधून एकावेळी सुमारे 1,178 प्रवासी प्रवास करू शकतात. 6 डबे झाल्यानंतर प्रवासी क्षमता 1,792 प्रवाशांपर्यंत पोहोचेल. प्रत्येक मेट्रो फेरीमागे जवळपास 614 अतिरिक्त प्रवाशांना प्रवास करता येईल. स्थानकांचे प्लॅटफॉर्म आधीच 6 डब्यांच्या ट्रेनसाठी डिझाइन केले असल्याने प्लॅटफॉर्म रचनेत बदल करण्याची गरज भासणार नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
अंधेरी, घाटकोपरसह इतर स्थानकांवरही गर्दी
नव्याने सुरू झालेल्या भुयारी मेट्रो, यलो लाईन-2ए आणि रेड लाईन-7 या मेट्रो मार्गिकांमुळे मेट्रो-वनच्या प्रवाशांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अंधेरी, घाटकोपर या मुख्य स्थानकांव्यतिरिक्त आता मरोळ नाका आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग या स्थानकांवरही प्रवाशांच्या गर्दीचा ताण येत आहे. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळच्या पीक अवर्सला गर्दी नियंत्रित करावी लागत आहे.


























































