Javed Khan Amrohi ‘लगान’ फेम अभिनेते जावेद खान अमरोही यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते जावेद खान अमरोही (Javed Khan Amrohi) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 60व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अकाली निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

जावेद खान अमरोही यांनी 150 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. यासह छोट्या पडद्यावरही त्यांनी वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मंगळवारी त्यांचे निधन झाले. मात्र, त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अभिनेते अखिलेंद्र मिश्रा यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून जावेद खान अमरोही यांच्या निधनाची माहिती दिली.

2001मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लगान’ (Lagaan) या चित्रपटामध्येही त्यांनी भूमिका साकारली होती. या चित्रपटातील बेस्ट सपोर्टिंग रोलसाठी त्यांना अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. यासह ‘अंदाज अपना अपना’ (Andaz Apna Apna) आणि ‘चक दे इंडिया’ (Chak De India) या चित्रपटांमध्ये त्यांनी विशेष भूमिका साकारली होती.

जावेद खान यांनी ‘मिर्झा गालिब’ (Mirza Ghalib) या मालिकेत काम केले होते. जावेद खान अमरोही यांनी झी इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया आर्ट्समध्ये अभिनय शाखेत शिक्षक म्हणूनही काम केले होते.

जावेद खान अमरोही यांचा जन्म मुंबईत झाला. बॉलिवूडमध्ये सहाय्यक भूमिकांसोबतच त्यांनी कॅमिओ देखील केले. जवळपास 150 हिंदी चित्रपटांमधील त्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांनी प्रेक्षकांवर छाप सोडली. अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी स्टारर ‘फिर हेरा फेरी’ चित्रपटात त्यांनी पोलीस हवालदाराची भूमिका साकारून प्रेक्षकांना खळखळून हसवले होते.