
मातृत्व हे अनादिकालापासून विचारवंत -तत्वज्ञ -साहित्यिकांना प्रेरित करणारे एक सनातन गूढ आहे. जगाच्या सांस्कृतिक इतिहासात ‘मातृत्व ‘ ही सर्वात गौरवशाली संकल्पना, एक सुवर्ण मानक, ‘द ओल्डेस्ट लव्ह स्टोरी’ मानली गेली आहे. पण या संकल्पनेचा वास्तवदर्शी आलेख काही वेगळेच सत्य सांगताना दिसतो. या विरोधाभासाचे आयाम व्यक्त करण्यासाठी ज्येष्ठ साहित्यिका -समीक्षक -लघुपटदिग्दर्शक रिंकी रॉय -भट्टाचार्य आणि पत्रकार मैथिली राव यांनी संपादन केलेल्या ‘द ओल्डेस्ट लव्ह स्टोरी’ या लेखसंग्रहाचे प्रकाशन दिनांक २ जून रोजी होत आहे. या संग्रहामध्ये अंतर्भाव केलेल्या कथनांद्वारा मातृत्व आणि वात्सल्य या संकल्पनांच्या जुन्या -नव्या पैलूंची विस्तृत ,बहुआयामी आणि सूक्ष्मस्तरीय मांडणी करण्यात आली आहे . ओम बुक्स इंटरनॅशनलतर्फे प्रकाशित ‘द ओल्डेस्ट लव्ह स्टोरी‘ च्या प्रकाशन समारंभाला अभिनेत्री पद्मश्री शबाना आझमी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या आई अभिनेत्री शौकत आझमी यांच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेणारा खास लेखही या संग्रहात समाविष्ट केलेला आहे.
या संग्रहामध्ये ‘महाभोज ‘आणि ‘आपका बंटी ‘सारख्या अभिजात साहित्यकृतींच्या लेखिका मन्नू भंडारींसह कमला दास ,शशी देशपांडे , नबनीता देव -सेन , ‘वैदेही’ जानकी श्रीनिवास मूर्ती , ‘अंबाई’ सी. एस. लक्ष्मी या साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखिका ,दलित लेखिका- कार्यकर्त्या उर्मिला पवार,ज्येष्ठ कथा -पटकथाकार सुधा अरोरा ,लेखिका -अनुवादक सरोज बावडेकर ,प्राध्यापिका -साहित्यिका रोशन जी शहानी आणि टुटून मुखर्जी , अमेरिकास्थित कथालेखिका सीता भास्कर या वैविध्यपूर्ण वैचारिक पार्श्वभूमी असणार्या इंग्लिश ,मराठी ,कन्नड ,हिन्दी ,तामिळ आणि बांगला मधल्या ज्येष्ठ -श्रेष्ठ साहित्यिकांच्या लेखांचा समावेश केला गेला आहे.
तसेच चित्रपट समीक्षेसाठी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दीपा गहलोत , राज्य-आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त रंगकर्मी चित्रा पालेकर , ज्येष्ठ चित्रकर्मी ललिता लाजमी , लघुपटदिग्दर्शक रूपा बारूआ यांचेही लेख यात समाविष्ट करण्यात आले आहेत. ‘अम्मी : लेटर टू ए डेमोक्रॅटिक मदर‘ लिहिणारे चित्रपट-दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा यांच्यासह साहित्य अकादमी तथा बेट्टी ट्रास्क प्राइजचे मानकरी अमित चौधरी हे देखील या मांदियाळीत सामील आहेत, या नावांवरूनच या संग्रहात उमटलेल्या बहुआयामी दृष्टिकोनांच्या विविधतेची आणि व्यापकतेची कल्पना येते.
लेकींनी आपल्या कर्तुत्ववान आयांच्या आठवणींची केलेली उजळण ,स्वतःच्या मातृत्वाबद्दल अपारंपरिक विचार आणि अनुभवचित्रण मांडणारे लेख ,किशोरवयीन मुलाने निर्माण केलेल्या वादळांचा सामना करणार्या आईची कथा, पतीच्या निधनानंतर दोन लेकांना धैर्याने वाढवणार्या आईचे आत्मकथन, डाऊन सिण्ड्रोम असलेल्या मुलाच्या विकासासाठी धडपणार्या दृढनिश्चयी आईचे अनुभव, तीन मुलांचा बाप असलेल्या विधुराशी लग्न करण्याच्या निर्णयामुळे आलेल्या जवाबदारीचे निष्ठेने पालन करण्यार्या स्त्रीचे चित्रण अशा वैविध्यपूर्ण चोवीस कथा -कथनांचा कोलाज इथे या पुस्तकात वाचायला मिळेल. रसिक वाचकांना तो निश्चितच आपलासा वाटेल. औपचारिक प्रकाशन समारंभानंतर प्रमुख पाहुण्यांसह, संपादकद्वयी आणि सहभागी लेखक यांच्याबरोबर चर्चेचा कार्यक्रम होईल.
लेखसंग्रहाचे शीर्षक : द ओल्डेस्ट लव्ह स्टोरी
प्रमुख पाहुण्या : ज्येष्ठ अभिनेत्री पद्मश्री शबाना आझमी
संपादक : रिंकी रॉय -भट्टाचार्य ,मैथिली राव
प्रकाशक : ओम बुक्स इंटरनॅशनल
स्थळ : टायटल वेव्ह्ज ,सेंट पॉल मीडिया कॉम्प्लेक्स,रोड नं २४, ड्युरेलो कॉन्व्हेंट समोर , वांद्रे पश्चिम,
तारीख/वेळ : २ जून ,संध्याकाळी ६.०० वाजता





























































