
सामना प्रतिनिधी । नगर
पारनेर मतदार संघात नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील तसेच मतदारसंघातील पूर्वीच्या गावांमधील विकासाचा २५ वर्षांचा बॅकलॉग आपण भरून काढला असल्याचे प्रतिपादन विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांनी केले.
नगर तालुक्यातील वाकोडी येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांच्या हस्ते व आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बाजार समितीचे सभापती विलास शिंदे, संचालक संदीप कर्डिले, हरिभाऊ कर्डिले, दिलीप भालसिंग, बाबासाहेब खर्से, बन्सी कराळे, बाळासाहेब निमसे, उद्धव कांबळे, भाऊसाहेब लांडगे, बाळासाहेब परभाणे, बबनराव परभाणे, अरुण इनामकर, शरद तोडमल, उपसरपंच अमोल तोडमल, राधाकृष्ण कराळे, बापू कुलट, खंडू काळे आदी उपस्थित होते.
औटी पुढे म्हणाले, शिस्तबद्ध काम केल्यामुळे ते वेळेत पूर्ण होवून जनतेचा फायदा होतो. आपला तो स्वभाव आहे आणि तो आता मतदार संघातील जनतेला माहित झाला आहे. कामाच्या माध्यमातून जनते पुढे मत मागायला गेले पाहिजे. तेच आजपर्यंत आपण केले आहे. ग्रामपंचायत हा लोकशाहीचा पाया आहे. केंद्राचा थेट निधी आता ग्रामपंचायतला मिळत आहे. हा सरकारचा चांगला निर्णय असल्याचे ते म्हणाले.
आ. शिवाजी कर्डिले म्हणाले, औटी हे अभ्यासू असून पारदर्शी कारभार करणारे लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळेच ते आता चौथ्यांदा पुन्हा आमदार होतील यात शंका नाही. नगर व पारनेर हे तालुके कायम दुष्काळी आहेत. या तालुक्यांना कायमस्वरूपी पाणी मिळावे यासाठी आम्ही प्रयत्न करू. केंद्र व राज्यातील युती सरकारने ग्रामीण भागाला मोठ्या प्रमाणावर विकास निधी दिला आहे. रस्त्यांचे जाळे निर्माण केले आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविले असल्याचे आ.कर्डिले म्हणाले.
वाकोडीचे सरपंच हरिभाऊ कर्डिले म्हणाले, वाकोडी गाव या पूर्वी नगर शहर मतदार संघात होते, या गावाला गेल्या २५ वर्षात निधी मिळाला नाही, पण ना.औटी यांनी मोठ्या प्रमाणावर निधी देवून विकासाचा बॅकलॉग भरून काढला आहे. नगर महापालिका वाकोडी जवळ सांडपाणी प्रक्रिया व शुद्धीकरण प्रकल्प उभारत आहे. या प्रकल्पातून प्रक्रिया केलेले पाणी वाकोडी गावातील शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे. यासाठी आ. कर्डिले यांनी सहाय्य करावे, अशी मागणी केली. कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






























































