
कारागृहाच्या अधिकारी निवासस्थानाजवळ गुन्हेगाराबरोबर दारू पार्टी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कारागृह अधीक्षकांनी नाशिकरोड कारागृहातील तीन तुरुंग अधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे, महानिरीक्षकांनाही याबाबतचा अहवाल पाठविला आहे.
नाशिक शहरातील अंबडसह अन्य पोलीस ठाण्यात एकावर फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत, तो जामिनावर बाहेर आहे. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील अधिकाऱयांच्या निवासस्थानाबाहेर तीन अधिकारी या गुन्हेगाराबरोबर दारू पार्टी करीत असल्याचा व्हिडीओ रविवारी तुफान व्हायरल झाला. यामुळे कारागृहातील सुरक्षा आणि कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या व्हिडीओने शहरात एकच खळबळ उडाली. यात दिसणाऱया तीन तुरुंग अधिकाऱयांना कारागृह अधीक्षकांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, सात दिवसांच्या आत खुलासा मागितला आहे, तुरुंग महानिरीक्षकांनाही अहवाल पाठविला आहे.
n फसवणुकीचे गुन्हे दाखल असलेल्या या गुन्हेगाराचे गॉडफादर गेल्या काही महिन्यांपासून या कारागृहात आहेत, त्यांची बडदास्त राहावी म्हणून त्याने या अधिकाऱ्यांना खूश करण्यासाठी ही पार्टी दिल्याची चर्चा आहे.


































































