सुडबुद्धीने खडी क्रेशर बंद केल्याचा आरोप; विजय गोगावळे यांचा आत्मदहनाचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । खेड

आवश्यक त्या सर्व शासकीय परवानग्या असतानाही खेड आंबवली मार्गावरील गणपती कृपा स्टोन क्रशर सुडबुद्धीने बंद करण्यात आली असल्याचा आरोप करत स्टोन क्रशरचे मालक विजय गोगावले 26 जानेवारी रोजी आत्मदहन करणार आहेत.

याबाबत माहिती देण्यासाठी बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले खेड तालुक्यात एकूण 10 खडी क्रशर आहेत. या पैकी माझ्या खडीक्रेशरसह केवळ तीन खडी क्रेशर मालकांकडे पर्यावरण विभागाचा दाखला आहे. मात्र त्या सर्व खडी क्रेशर दिवस-रात्र सुरु आहेत. माझ्याकडे आवश्यक त्या सर्व परवानग्या असतानाही माझ्या खडीक्रेशरचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.

व्यवसायासाठी मी कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतले आहे. शिवाय माझ्याकडे असलेल्या 35 कामगारांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह माझ्या व्यवसायावर होतो आहे. केवळ सुडबुद्धीने माझे खडी क्रेशर बंद करण्यात आल्याने व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकले आहेत तर क्रेशरवर काम करणार्‍या कामगारांचाही रोजगार बुडाला आहे.

केवळ सुडबुद्धीने केल्या जाणार्‍या  अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आत्मदहनाशिवाय पर्याय उरलेला नसल्याने मला आत्मदहनाचा टोकाचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे विजय गोगावळे यांनी म्हटले आहे.