
आठ हजार कोटींच्या ऍम्ब्युलन्स घोटाळय़ानंतर मिंधे सरकारचा मोबाईल घोटाळा आणि साडी घोटाळा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चव्हाटय़ावर आणला आहे. मर्जीतल्या कंपनीकडून 155 कोटी रुपयांची मोबाईल खरेदी करण्याचा सरकारचा इरादा असल्याचा वडेट्टीवार यांचा आरोप आहे. त्याचबरोबर निवडणुका डोळय़ासमोर ठेवून मते मिळवण्यासाठी अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना सरकार साडय़ा वाटणार आहे. हा घोटाळादेखील 100 कोटींच्या वर आहे, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
मिंधे सरकारमध्ये दोन अलिबाबा आणि 80 चोर आहेत, त्यांच्यात पैसे खाण्याची स्पर्धा सुरू आहे, असा हल्लाबोल विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत केला. अंगणवाडी सेविकांना मोबाईल देण्याची शक्कल सरकारने लढवली असून त्याद्वारे घोटाळा केला जाणार आहे. दिल्लीतील एका कंपनीकडून महिला व बाल विकास विभाग हे मोबाईल खरेदी करणार असून ही कंपनी सरकारमधील कुणाच्या जवळची आहे याची चौकशी करावी, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली. मोबाईल द्यायचाच असेल तर सरकारने अंगणवाडी सेविकांच्या खात्यात थेट पैसे जमा करावेत आणि त्यांना हवा तो मोबाईल घेण्याची मुभा द्यावी, मग भ्रष्टाचार होणार नाही, असे वडेट्टीवार म्हणाले.
एक कोटी साडय़ा!
अंत्योदय शिधापत्रिकाधारक प्रत्येक कुटुंबाला देण्यासाठी सरकार 25 लाख साडय़ा खरेदी करणार असल्याचे सांगितले जात आहे. हा केवळ दिखावा असून प्रत्यक्षात एक कोटी साडय़ा खरेदी केल्या जाणार असल्याची आपली माहिती असल्याचेही विजय वडेट्टीवार म्हणाले. साडय़ा खरेदीचे हे पैसे महिलांच्या सुरक्षेसाठी खर्च करावेत, असे ते म्हणाले.
























































