राजकीय दबावाखाली खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करा, विलास पोतनीस यांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कांदिवली (पूर्व) येथील माजी नगरसेवक योगेश भोईर यांच्यावर राजकीय दबावाखाली खोटे गुन्हे दाखल करणाऱया पोलीस अधिकाऱयांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी शिवसेना आमदार विलास पोतनीस यांनी आज विधान परिषदेत विशेष उल्लेख सूचनेद्वारे केली.

डिसेंबर 2022 मध्ये दहिसर येथील गुन्हे प्रकटीकरण शाखा युनिट 12 ने भीमसेन यादव या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्या गुह्यात भोईर यांचा कोणताही संबंध नसताना हेतूपुरस्सर गोवण्यात आले, असे आमदार पोतनीस यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. सत्र न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीनदेखील मंजूर केला, तसेच सदर प्रकरणातील फिर्यादी यांनी न्यायालयात सदर गुह्याशी भोईर यांचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. तरीदेखील सदर गुह्याच्या तपासकामी त्यांना बोलावून, तासन्तास बसवून ठेवून त्यांचा मानसिक छळ करण्यात आला, असे पोतनीस यांनी म्हटले आहे.

भोईर यांच्यावर कांदिवलीच्या समता नगर पोलीस ठाण्यातदेखील खोटा गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली आणि बेकायदेशीपणे सदर प्रकरण कांदिवलीतील गुन्हे प्रकटीकरण शाखा युनिट 11 कडे वर्ग करण्यात आले. त्या प्रकरणातही न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानेदेखील भोईर यांच्या घरी बेकायदेशीरपणे धाड टाकली होती. त्यात काहीही आक्षेपार्ह आढळून आले नव्हते. मात्र या नाहक जाचामुळे भोईर कुटुंबीयांना मनस्ताप सहन करावा लागत आहे, असे पोतनीस यांनी नमूद केले आहे.