म्हाडा वसाहतीमधील सदनिका 19 फुटापर्यंत उंचीची परवानगी द्या! विलास पोतनीस यांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोराई आणि चारकोपच्या म्हाडा वसाहतींमधील बैठय़ा सदनिकांची उंची अधिकृतरीत्या 19 फुटापर्यंत वाढवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी शिवसेना आमदार विलास पोतनीस यांनी राज्य शासनाकडे केली आहे. विशेष उल्लेख सूचनेद्वारे आमदार विलास पोतनीस यांनी ही मागणी केली आहे. बोरिवलीतील गोराई आणि कांदिवलीतील चारकोप भागात म्हाडाच्या बैठय़ा सदनिका आहेत. 25 वर्षांपूर्वी लॉटरी पद्धतीने त्या वितरित करण्यात आल्या आहेत. हजारो सर्वसामान्य नागरिक त्या सदनिकांमध्ये राहतात. कालौघात कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढल्याने आता त्या सदनिकांची जागा रहिवाशांना अपुरी पडू लागली आहे अशी वस्तुस्थिती आमदार पोतनीस यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे.

या सदनिकांमध्ये वास्तव्यास असलेले नागरिक हे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. वाढत्या महागाईमुळे नवे घर घेणे शक्य नसल्याने त्यांनी आपल्या सदनिका दुमजली केल्या; परंतु स्थानिक प्रशासनातील अधिकारी त्या सदनिकाधारकांना त्यांनी वाढवलेले बांधकाम बेकायदा असल्याचे सांगत कारवाईची भीती दाखवून मोठय़ा प्रमाणावर हप्ते वसूल करत असल्याची माहिती आहे. त्या अधिकाऱयांमुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत.

राज्य शासनाने अशा बैठय़ा सदनिकांची उंची 19 फुटापर्यंत वाढवण्याची अधिकृत परवानगी म्हाडाकडून देऊन त्यांना दिलासा द्यावा, असे आमदार पोतनीस यांनी या सूचनेद्वारे नमूद केले आहे. ज्या रहिवाशांनी यापूर्वीच त्यांच्या सदनिका दुमजली केल्या आहेत त्यांनाही संरक्षण मिळावे, अशीही मागणी पोतनीस यांनी केली आहे.