
व्हायोलिनच्या माध्यमातून तब्बल सहा दशके संगीत क्षेत्राची सेवा करणारे ज्येष्ठ संगीतकार, व्हायोलिन वादक प्रभाकर जोग यांनी काही दिवसांपूर्वीच जगाचा निरोप घेतला. या महान कलावंताला विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात स्वर श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. निमित्त होते ते ‘जुळल्या सगळ्या त्या आठवणी’ या कार्यक्रमाचे.
नगरसेवक अभिजित सामंत संचालित अटल सेवा केंद्राच्या वतीने आयोजित आणि आर्च एन्टरप्रायझेस प्रस्तुत या कार्यक्रमात जोग यांनी ज्या संगीतकारांच्या गाण्यांना व्हायोलिनची साथ दिली. अशा संगीतकारांची लोकप्रिय निवडक गाणी या वेळी व्हॉयलिनिस्ट महेश खानोलकर यांनी व्हॉयलिनच्या माध्यमातून सादर केली ज्यात ‘जीवनात ही घडी’, ‘यारा सिली सिली’, ‘इस मोड से जाते है’पासून आजच्या काळातील अनेक गाण्यांचा समावेश होता. गीत रामायणमधील ‘पराधीन आहे जगती’ या गीताने सोलो व्हॉयलिन वादनाची सांगता झाली. या वेळी ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी जोग यांच्या आठवणींना उजाळा दिला.
हर्षवर्धन गोरे, अनुष्का रानडे, भार्गवी करलगीकर या बालकलाकारांनी ‘गुरूने दिला ज्ञानरूपी वसा’ हे गाणे सादर केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात मंदार आपटे, माधुरी करमरकर, विद्या करलगीकर, प्राजक्ता रानडे, ऋषिकेश रानडे, जोग यांचे नातू अमेय आणि दीपिका तसेच अर्चना गोरे यांनी सादर केलेल्या गाण्यांनी जोग यांच्या अलौकिक स्वर प्रतिभेची पुनःअनुभूती दिली. या कार्यक्रमाला जोग यांचे सुपुत्र श्रीनिवास जोग, कार्यक्रमाच्या प्रायोजक प्रीता सुळे, राजेश आजगावकर, सहसंयोजिका अंजली सामंत, सुनील मोने आदी उपस्थित होते. संगीत संयोजन आनंद सहस्रबुद्धे यांचे तर संकल्पना विनित गोरे यांची होती.
























































