
दहा जूनची संध्याकाळ तेजःपुंज ठरली. नाशिकहून एका मित्राचं आवतण आलं होतं. ‘‘काजवे आलेत, लवकर या.’’ मुंबईहून आणखी एका मित्राच्या कारने त्वरित निघालो. त्र्यंबकेश्वरच्या पुढे आंबोली गावात पोहोचलो तेव्हा सूर्य मावळत होता. स्वच्छ, प्रदूषणविरहित वातावरणातला तो सूर्यास्त मोहक वाटत होता. अनेक एकरांच्या पठारालगतची दरी वनश्रीने बहरली होती. तिथे त्यांची ‘पॅम्पिंग’ची जागा साकारली आहे. आम्हाला उत्सुकता होती, काजवे कुठे असतील नि केव्हा दिसतील! त्यावर ते म्हणाले, ‘‘थोडं थांबा, काजवे इथेच आहेत. अंधार पडला की, दिसायला लागतील. इथे असलेल्या ऐनाच्या झाडांवर ते विशेषत्वाने असतील.’’ ऐन किंवा अर्जुन-सादडा या झाडांच्या मोहराने आकर्षित होऊन काजवे येतात असे त्यांचे निरीक्षण. वन-कानन समजून घ्यायचं तर बराच काळ त्याच्या सान्निध्यात राहायला हवं.
जसजसा अंधार दाटू लागला तसतशी अंधारभरल्या झाडांमधील चमचमही वाढायला लागली. आधी दोन-चार, मग पाच-पन्नास आणि बघता बघता हजारो काजव्यांनी ओथंबलेली झाडं चहूकडे दिसू लागली. त्या रात्री चंद्र उशिरा उगवणार असल्याने निरभ्र आकाशातले तारेही लुकलुकत होते. पश्चिम क्षितिजावर तेजस्वी शुक्र ग्रह खुणावत होता. असा सारा भूमीपासून आकाशापर्यंत चाललेला विराट निसर्गाचा लखलखता आविष्कार आम्ही अनिमिषपणे डोळय़ांत आणि मनात साठवत होतो.
तसे बालपणापासून मुंबईतही अनेकदा खार जमिनीवरच्या तिवरांच्या झुडुपांमध्ये काजवे पाहिले होते. गणपती विसर्जनाच्या काळात घाटकोपरच्या खाडीवरून परत येताना सभोवती काजव्यांची आरास दिसायची. पावसाच्या आरंभी किंवा सरत्या पावसाच्या काळात ‘प्रगट’ होणारे हे इवलेसे तेजस्वी, स्वयंप्रकाशी सजीव. त्यांचं वर्णन शब्दांत किती नि कसं करणार!
काजव्यांचे उल्लेख अगदी प्राचीन काळापासून जगातल्या वाङ्मयात आढळतात. कथा, कविता, गाण्यांमधून दिसणारे काजवे प्रत्यक्षात न्याहाळणे ही अत्यानंद देणारी अनुभूती. एका दिवाळीत कोकणात आंजर्ले येथे गेलो होतो. रात्र अवसेच्या जवळचीच. तिथून केळशीकडे येताना वाटेत एका उंचवटय़ावर गाडी थांबवली. एका बाजूला दूरच्या गावातल्या दिवाळीच्या मिणमिणत्या पणत्या दुसरीकडे काजव्यांची मुक्त लगबग आणि वर आकाशात आकाशगंगेचा पट्टा असं सारं प्रकाशपर्व पाहताना स्तिमित होऊन गेलो. अशा अनुभवांसाठी रोजच्या धावपळीतून वेळ काढायला शिकले पाहिजे. सुट्टीच्या दिवशी काजवे पाहू किंवा पावसात जाऊ असं नाही ठरवता येत. पावसाच्या किंवा काजव्यांच्या ‘दिवशी’ सुट्टी घेऊन जाता यायला हवं. अर्थात, असं सगळय़ांनाच शक्य नाही हे खरं, पण प्रयत्न करावेत. आधीच तसं नियोजन करावं.
काजव्यांच्या ‘बायोल्युमिनेसन्स’ किंवा प्रकाश निर्माण करण्याच्या अद्भुत शक्तीवर मुख्यत्वे संशोधन केलं ते विल्यम मॅप्एच्रॉय या संशोधकानं. 82 वर्षांच्या जीवनात त्यांनी कीटकांच्या पेशी, त्यांच्यातील रासायनिक प्रक्रिया अशा अनेक गोष्टींचा सखोल अभ्यास केला. गेल्या 22 जूनलाच त्यांची जयंती झाली. अशी ध्यास असलेली माणसं आपल्यासाठी निसर्गातील एकेक ‘रहस्य’ उलगडून दाखवतात. प्रा. विल्यम यांनी काजव्यांचं संशोधन करणारं विद्यार्थी पथकच हॉपकिन्स विद्यापीठात तयार केलं. शेकडो काजव्यांचा अभ्यास करून त्यांनी काजवे शरीराच्या मागच्या भागातून मीलनाचा संदेश देणारा प्रकाश कसा निर्माण करतात ते सांगितले. ‘अॅडेनोसिन ट्रायफॉस्फेट’ किंवा ‘एटीपी’चा यातील सहभाग शोधून काजव्यांची चमचम वैज्ञानिक पद्धतीने जगासमोर आणली म्हणून त्यांना ‘फायरफ्लाय मॅन’ किंवा ‘काजवास्नेही’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं.
काजव्यांच्या प्रकाश उत्सर्जनाची ही प्रक्रिया अधिक स्पष्ट करताना प्राणिशास्त्र्ाज्ञ डॉ. सुजाता देशपांडे म्हणाल्या की, ‘‘ल्युसिफेरेस हे एन्झाइम (विकिर) आणि मॅग्नॅशियमच्या ‘आयन’चा वैज्ञानिक (तेच एटीपी) संयोग होऊन काजवा प्रकाश निर्माण करतो. हे मीलनाचा प्रतिसाद मिळण्यासाठी असतो. यापेक्षा अधिक वैज्ञानिक प्र्रक्रिया समजून घेणे किचकट वाटेल, पण सर्वसामान्यांना विज्ञानातलं मर्म थोडंसं समजावं एवढीच या लेखांची व्याप्ती असते.
काजवे दहा ते पंचवीस मिलीमीटर (1 इंच) आकाराचे असतात. त्यांच्या अळय़ा झाडातील खोडाच्या खालच्या बाजूच्या कवचात किंवा जमिनीत सूक्ष्म नळय़ांसारखी छिद्रं करून वाढतात. त्या बराच काळ तशा अवस्थेत राहतात. काजव्याच्या जन्मानंतरचे आयुष्य मात्र अवघ्या काही आठवडय़ांचं असतं. त्यांच्या स्वयंप्र्रकाशात अल्ट्राव्हायोलेट किंवा इन्फ्रारेड असं काही नसल्यानं तो ‘शीतप्र्रकाश’ ठरतो.
आपल्याला नेत्रसुखद वाटणारे काजवे त्यांच्या प्रजननासाठी चमचमतात. वाढतं प्रकाश प्रदूषण, हवेतील रसायनं, कीटकनाशपं आणि अतिउत्साही पर्यटक या सगळय़ांचा त्यांना त्रास होतो. निःशब्दपणे काजव्यांचे निरीक्षण करावे. ते पकडू नयेत. त्यांच्याशी खेळ करू नये. सारखा फोटो काढण्याचा प्रयत्न करू नये. ‘फ्लॅश’ची तर गरजच नाही. अशी काळजी घेऊन या वार्षिक पाहुण्यांचं जरूर दर्शन घ्यावं आणि जतनही करावं. सहय़ाद्रीच्या समृद्ध निसर्गात ते आपल्याला ठायी ठायी आढळतील!
>> विनायक































































