व्हायोलीन हीच ओळख व्हावी! – यज्ञेश रायकर

व्हायोलीनचा विचार होईल तेव्हा आपलेच नाव लोकांच्या डोळ्यांसमोर यावे, अशी यज्ञेश रायकर याची इच्छा आहे. त्यासाठी तो झटतोय.

व्हायोलीन हे एक असं वाद्य आहे जे मनापासून वाजवले पाहिजे. तरच ते उत्तम वाजवता येते. त्यासाठी अर्थात सुरांचा चांगला अभ्यासही असावा लागतो… आणि एकदा व्हायोलीन वाजवता येऊ लागलं की मग इतर कोणतीही वाद्ये शिकणं कठीण जात नाही. हे मत आहे आजच्या घडीचा व्हायोलीनवादक यज्ञेश रायकर याचं. लहानपणापासूनच व्हायोलीनचं बाळकडू मिळालेला यज्ञेश गेल्या 15 वर्षांपासून व्हायोलीन वाजवायला शिकतोय. आता त्याला व्हायोलीन म्हणजेच यज्ञेश रायकर हे समीकरण व्हायला हवं असं वाटतं.

व्हायोलीन वादनाची आकड त्याला लहानपणापासूनच … याबाबत आठवण सांगताना तो म्हणतो, ‘मी खरं तर लहानपणी तबला वाजवायला शिकत होतो. पण त्यावेळी वडिलांना व्हायोलीन वाजकताना बघायचो. ते बघून बघून मीही व्हायोलीन हातात घेऊ लागलो. मग त्याचं वेडच लागलं.’ व्हायोलीन वादनात त्याला असंख्य पुरस्कार मिळालेत. पं. डी. बी. पलुस्कर ऍवॉर्ड, उत्तुंग पुरस्कार त्याने पटकावलाय. याच महिन्यात सप्टेंबरमध्ये त्याला ‘भारतरत्न एम. एस. सुब्बलक्ष्मी स्कॉलरशिप’ मिळणार आहे. तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासमोर त्याला व्हायोलीन वाजवायची संधी मिळाली होती. व्हायोलीन हे वाद्य केकळ साथसंगतीसाठीच अशीच या वाद्याची ओळख आहे. पण व्हायोलीनला सोलो इन्स्ट्रुमेंट असा दर्जा मिळावा अशी यज्ञेशची इच्छा आहे. त्यासाठीच तो त्याचा जास्तीत जास्त अभ्यास करतोय.