
मुंबईत एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी मलेरिया, लेप्टो, डेंग्युसारखे पावसाळी आजार मात्र आता चांगलेच आटोक्यात आले आहेत. यामध्ये गेल्या 15 दिवसांत मलेरियाच्या रुग्णांमध्ये चार पटींनी घट झाली आहे. तर लेप्टोस्पायरोसिस, डेंग्युचे रुग्णही निम्म्याने कमी झाले असून एकही मृत्यू झालेला नाही. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून पावसाळी आजारांना रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळेच हे यश आले आहे.
मुंबईत ऑगस्टअखेरपासून पुन्हा एकदा कोरोना रुग्ण वाढू लागले असताना पावसाळी आजारही वाढू लागल्याने पालिकेसमोर आव्हान निर्माण झाले होते. यामध्ये 16 ऑगस्ट रोजी मलेरिया रुग्णांची संख्या – 592, लेप्टो – 16, डेंग्यू – 6, 25 ऑगस्ट रोजी – 881, लेप्टो – 28, डेंग्यू-7 आणि 2 सप्टेंबर रोजी मलेरिया रुग्णांची संख्या थेट 1137 तर लेप्टो – 45 आणि डेंग्यूच्या रुग्णांची संख्या 10 वर पोहोचली होती. मात्र पालिकेच्या आरोग्य विभागाकडून पावसाळी आजार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांना गेल्या 15 दिवसांत चांगलेच यश येऊ लागले आहे. यामध्ये मुंबईभरात जंतूनाशक फवारणी, डास प्रतिबंधक फवारणी करणे, घरोघरी जाऊन तपासणी करणे, डास उत्पन्न करणारी लाखो ठिकाणे नष्ट करणे, स्वच्छता उपक्रम, नागरिकांमध्ये पावसाळी आणि साथीचे आजार रोखण्यासाठी आवश्यक जनजागृती करणे यामुळे चांगलेच यश आले असल्याची माहिती मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली. या कामासाठी आरोग्य विभागासह किटकनाशक विभाग, सफाई कामगार मेहनत घेत आहेत.
1500 बेड तैनात
पालिकेच्या माध्यमातून नॉन कोविड रुग्णांसाठीदेखील पालिकेच्या केईएम, शीव, नायर अशा प्रमुख रुग्णालयांसह पेरिफेरल रुग्णालयांमध्ये दीड हजार बेड तैनात ठेवण्यात आले आहेत. याशिवाय नॉन कोविड आजारांवर संबंधित सर्व रुग्णालयांमध्ये आवश्यक उपचार मिळण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या. आता पावसाळी आजारही आटोक्यात आल्याने मुंबईकरांना चिंता करण्याचे कारण नसल्याचा विश्वास पालिका प्रशासनाकडून व्यक्त केला.
























































