
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
वर्ल्डकप स्पर्धेला खऱ्या अर्थाने सुरुवात होण्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने एक मोठा खुलासा केला आहे. अनुष्का शर्मासोबत लग्न झाल्यानंतर फक्त फलंदाजी आणि खेळातच सुधारणा झाली नाही तर कर्णधारपदाची कामगिरीही सुधारली आहे, असे विराट कोहली म्हणाला आहे. आयसीसीच्या एका कार्यक्रमात बोलताना त्याने हे विधान केले आहे.
विराट म्हणतो, ‘लग्नानंतर तुम्ही अधिक जबाबदार होतात. लग्नानंतर तुम्ही प्रत्येक गोष्ट चांगल्या पद्धतीने समजून घेण्यास सुरुवात करता. तुम्ही त्यात सुधारणा होण्यासाठी झोकून देतात. मी देखील पहिल्यापेक्षा जास्त जबाबदारीने वागत आहे. यामुळे माझ्या कर्णधारपदाच्या कामगिरीतही सुधारणा झाली आहे. तसेच एक माणूस आणि एक खेळाडू म्हणूनही माझ्यात बरेच बदल झाले आहेत.’
क्रिकेटपटू विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचे 11 डिसेंबर, 2017 रोजी विवाह झाला. यानंतर आपली कामगिरी अधिक सुधारली असे विराट म्हणाला.


























































