‘विराट’ झेंडा फडकला, आयसीसीच्या मानाच्या तिन्ही पुरस्कारांवर उमटवली मोहोर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानी संघाचा कर्णधार विराट कोहली याच्यासाठी 2018 हे वर्ष समृद्धी आणि भरभराटीचे राहिले. मैदानावर आणि मैदानाबाहेरही त्याच्याच नावाची फक्त चर्चा होती. नुकत्याच 2018 सालासाठी जाहीर झालेल्या आयसीसीच्या मानाच्या पुरस्कारांवरही विराटने आपली मोहोर उमटवली आहे. सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूला दिला जाणारा सर गॅरफिल्ड सोबर्स पुरस्कार, सर्वोत्तम एक दिवसीय क्रिकेटपटू आणि सर्वोत्तम कसोटीपटू असे तिन्ही मानाचे पुरस्कार विराटने पटकावले आहेत. एकाच वर्षात आयसीसीचे मानाचे तिन्ही पुरस्कार पटकावणारा विराट पहिलाच खेळाडू ठरला आहे.

विराट कोहलीने 2018 मध्ये एक दिवसीय क्रिकेटमध्ये 133.55 च्या सरासरीने 1,202 धावा चोपल्या. यात त्याच्या सहा शतकांचा आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच याच दरम्यान त्याने एक दिवसीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पाही ओलांडला. यासह त्याने या वर्षी अनेक विक्रमांचे डोंगरही रचले.

कसोटीमध्येही गेल्या वर्षी विराटने खोऱ्याने धावा ओढल्या. विराटने 55.08 च्या सरासरीने 1322 धावा चोपल्या. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या मालिकांमध्ये त्याने शतकं ठोकण्याची कामगिरी केली. तसेच त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली.

दरम्यान, आयसीसीच्या कसोटी आणि एक दिवसीय संघाचेही विराट कोहलीने कर्णधारपद मिळवले आहे. त्यामुळे 2018 हे वर्ष विराटसाठी खास लक्षात राहण्यासारखेच आहे.