ओढ सावळय़ा रूपाची…

2180

नमिता वारणकर,[email protected]

ऊन, वारा, पाऊस कशालाही दाद न देता त्यांचे मन फक्त माऊलीच्या भेटीसाठी आसुसलेले असते… भावभक्तीच्या बळावर केलेला…वैष्णवांना साक्षात पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लावणारा… डोळ्यांचे पारणे फेडणारा हा सोहळा कसा असतो…

पांडुरंगाला हृदयात साठवणाऱया महाराष्ट्रातील तमाम वारकऱयांचा पारंपरिक आचारधर्म… पायी दिंडी… मूलभूत गरजांचीही अपेक्षा न बाळगता ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’, ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’, ‘जय जय रामकृष्ण हरी’….असा नामघोष करत तुकोबा, ज्ञानोबा माऊलींचे अभंग गात कानाकोपऱयांतील लाखो वारकरी दरवर्षी न चुकता हा प्रवास मोठय़ा श्रद्धेने पार करतात…

 या भक्तिमय प्रवासाविषयी पंढरपुरातील उखळीकर मठातील श्री क्षीरसागर नरहरी महाराज उखळीकर सांगतात, आमचे आजोबा विठोबा अण्णा उखळीकर हे स्वतः हाती वीणा घेऊन दिंडीत पायी चालले होते. त्यांची हीच परंपरा आम्ही आजतागायत सुरू ठेवलेली आहे. त्यामध्ये कधीही खंड पडलेला नाही. आमची पुढची पिढीही वारकरी असून तीही ही परंपरा पुढे कायम ठेवेल. अशा अनेक मानाच्या दिंडय़ा वंशपरंपरागत सुरू आहेत. त्यांच्या कृपेमुळेच आम्ही हा प्रवास करत आहोत. वारीत सहभागी झालेल्या प्रत्येकामध्ये आम्ही माऊलींचं रूप बघतो. एकमेकांना ‘माऊली’ अशी हाक मारतो. त्यामुळे स्त्री पुरुष, लहान-मोठा, जातपात असा कोणताही भेदभाव राहत नाही. महत्त्वाचे म्हणजे या वैष्णवांच्या मेळ्यात अहंकार गळून पडतो आणि एकमेकांविषयी निरपेक्ष प्रेमभाव निर्माण होतो. कोणीही मदतीचा हात देतं. त्यामुळे ‘हे विश्वचि माझे घर’ ही भावना वाढीस लागते.

वारीदरम्यान शेती करण्याचे दिवस असतात. तरीही शेतीची कामे सोडून ते वारीत सहभागी होतात. ज्याने वारीतला आनंद एकदा घेतला आहे, त्याचे या दिवसांत शेतीत मन रमत नाही. माऊली आपल्या शेताची काळजी घेतील या श्रद्धेपोटी साऱया वारकऱयांची पाऊले आपसूकच पंढरपूरकडे वळतात. त्यासाठी त्यांना कोणतही आमंत्रण, पत्र, फोन कशाचीही आवश्यकता भासत नाही. चैत्र महिन्यापासून वारीचा कार्यक्रम आखायला सुरुवात होते. त्यासाठी बैठका होतात. सेवेकऱयांची कामं निश्चित होतात. सोहळ्याची वाटचाल, रचना, वेळ, जागा, तळ यांची जागा ठरवली जाते. ज्या गावात थांबणार त्या गावी आधीच जाऊन पाण्याची व्यवस्था, तंबू ठोकण्याची जागा, विद्युत व्यवस्था, जेवण व्यवस्था, भजनाचे नेतृत्व कोण बघणार याचे नियोजन केले जाते. प्रत्येक गावात थांबण्यासाठी केलेली तंबूची जागाही ठरलेलीच असते. त्याच जागी दरवर्षी तंबू ठोकला जातो. तंबूचं सामान, स्वयंपाकासाठी लागणारा गॅस, शेगडी, अन्नधान्य, भांडीकुंडी, वारकऱयांच्या बॅगा, पाण्याची व्यवस्था हे सामान आणि स्वयंपाक करण्यासाठी माणसे यांच्यासह दोन ट्रक भरून आम्ही वारकरी पायी दिंडीच्या प्रवासाला सुरुवात करतो. ज्या गावात रात्री मुक्काम असतो त्या गावी तंबू ठोकला जातो, स्वयंपाक बनवला जातो. महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळे तंबू बांधले जातात. एका तंबूत सोळा जण राहू शकतात.

दिंडी… स्वयंशिस्तीचा परिपाठ

प्रत्येक दिंडीचा एक दिंडी चालक असतो. तो दिंडीची आखणी करतो. पताका घेतलेले पताकाधारी, चोपदार, टाळकरी, मृदंगमणी, वीणेकरी, तुळस घेतलेल्या दिंडीतील महिला अशी दिंडीची रचना असते. मानाच्या दिंडय़ांना क्रमांक दिले जातात. पालखी रथाच्या पुढे आणि मागे त्यांची जागा ठरलेली असते. यामध्ये काही मानाच्या दिंडय़ा असतात. आता काही नवीन दिंडय़ाही निर्माण होत आहेत. एका दिंडीत १ हजार वारकरी असतात. दरवर्षी ही संख्या वाढतच आहे. प्रशासनाचा बंदोबस्त असो नसो, अभंग म्हणत स्वयंशिस्तीने वारकरीने दिंडीत चालतात. यादरम्यान कोणालाही त्रास होत नाही की चेंगराचेंगरीही होत नाही. ‘माऊली माऊली’ म्हणत हा प्रवास त्याची आस लागून सुरू असतो. आमचे पूर्वज काहीही सोयीसुविधा नसतानाही वारीला जात असत. आता मात्र सीसी टीव्ही, मोबाईल, रुग्णवाहिका, गॅस पुरवठा, पाण्याचे टँकर अशा आधुनिक सोयी मिळत आहेत असे क्षीरसागर महाराजांचे म्हणणे आहे.

वारीतला दिनक्रम

पहाटे चार वाजल्यापासून वारीला सुरुवात होते. काकड आरती, भजन, महापूजा आणि संध्याकाळची आरती झाल्यानंतर चोपदाराने सांगितलेल्या वेळेनुसार पालखीचे पुढच्या मुक्कामाकडे प्रस्थान होते. विसाव्यासाठी ती चोपदार आणि तुतारी इशाऱयानुसार थांबते. पाद्यपूजा, माऊलींना नैवेद्य दाखवून सर्वजण भोजन करतात. त्यानंतर पालखी पुन्हा मार्गस्थ होते. संध्याकाळी मुक्कामी पोहोचल्यावरही निरूपणाचा कार्यक्रम, आरती आणि हरिपाठ होतो. विशेष म्हणजे त्यानंतर दिवसभरात आलेल्या वारीतील अडचणी सांगितल्या जातात. दिंडीचालकामार्फत त्या सोडवल्या जातात.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या