
पंढरपूर येथून देवदर्शन करून गावी परतत असताना कार व एसटी बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कारमधील एकजण ठार झाला, तर पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. तर, एसटी बसधील दोघे जखमी झाले आहेत. पंढरपूर-मोहोळ रस्त्यावरील देगाव शिवारातील नाईकनवरेमळा येथे रविवारी सकाळी ही घटना घडली आहे. मृत व जखमी लातूर जिल्ह्यातील आहेत.
दत्तात्रय रामराव भोसले (वय 45) असे मृताचे नाव असून, व्यंकट मारुती भोसले, शरद वसंत भोसले, सुनील किसन भोसले, सचिन किसन कदम, कारचालक शंकर माधव मोटे, शिवाजी प्रल्हाद भोसले (सर्व रा. गोंदरी, ता. औसा, जि. लातूर) हे जखमी झाले आहेत. तसेच एसटी बसमधील काशिनाथ महादेव स्वामी (रा. चाअराखळी, ता. कळंब) व अमृता अनिल भुरटे (रा. हमीदवाडा, ता. कागल, जि. कोल्हापूर) हे जखमी झाले आहेत. याबाबत बसचालक योगेश ज्ञानदेव मेंडके (वय 27, रा. बामणी, ता. जि. धाराशिव) यांनी फिर्याद दिली आहे.
पंढरपूरहून श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन लातूरमधील सहा भाविक रविवारी सकाळी कारमधून चालले होते. देगाव शिवारातील नाईकनवरेमळा येथे आली असता, दुसऱया कारला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्यांची कार समोरून येणाऱया धाराशिव-कोल्हापूर एसटी बसला धडकली. यात कारमधील सहाजण जखमी झाले, तर दत्तात्रय भोसले यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.
जखमींना स्थानिकांच्या मदतीने पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी अशोक जाधव, नितीन चवरे, सुजित उबाळे यांनी घटनास्थळी येत वाहतूक सुरळीत केली. हेड कॉन्स्टेबल उबाळे तपास करीत आहेत.


























































