
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्यापासून बंद असलेला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा मुख्य दरवाजा आज मंदिर समितीने उघडला. मंदिराचा दरवाजा खुला केला असला तरी भाविकांना देवाचे दर्शन मात्र संत नामदेव महाराज पायरी पासूनच घ्यावे लागणार आहे. दिवाळी सणामुळे महाद्वार उघडले असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सुनील जोशी यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 17 मार्च पासून दक्षता म्हणून श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंद केले होते. तेव्हापासून संत नामदेव महाराज पायरी जवळील मंदिराचे महाद्वार देखील बंद ठेवण्यात आले होते. लॉकडाऊन काही अंशी शिथिल केल्यानंतर भाविकांना संत नामदेव महाराज पायरीचे दर्शन घेण्यास मुभा देण्यात आली होती. वारकरी भाविक चंद्रभागेचे स्नान करुन संत नामदेव महाराजांच्या पायरीचे दर्शन आणि देवाच्या मंदिराच्या पितळी महाद्वाराचे दुरुनच दर्शन घेऊन समाधान मानत होते. आज मात्र दिवाळी सणाचे औचित्य साधून मंदिर समितीने मंदिराचा प्रमुख दरवाजा उघडला आहे.
भाविकांसाठी मंदिर बंद असले तरी मंदिरातील नित्य उपचार, पूजाअर्चा परंपरेनुसार दररोज सुरु आहेत. ऑनलाइन दर्शनाच्या माध्यमातून भाविकांना देवाचे थेट दर्शन मंदिराच्या वेबसाईटवर घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आज मंदिराचा मुख्य दरवाजा उघडल्याने भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिवाळी नंतर मंदिर दर्शनासाठी खुले करु असे आश्वासन दिले आहे. मुख्य दरवाजा उघडल्याने मंदिरही लवकरच सुरु होण्याचा मार्ग सुखकर झाला आहे.


























































