ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा वसा अविरतपणे सुरु ठेवणार – रवींद्र शेट्ये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संगमेश्वर

व्यापारी पैसा फंड संस्थेचा नावलौकिक केवळ राज्यात आहे.असे नव्हे तर देशाच्या विविध भागात या संस्थेच्या शाळेने आपली ओळख पोहचवली आहे. ग्रामीण भागातील गरीब मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी या हेतूने आमच्या संस्थेने १९२९ साली सुरु केलेले प्रयत्न आज आर्थिकसह अनेक अडचणींवर मात करत अविरतपणे सुरु असून आपल्या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत संस्थेने यशोशिखर गाठले याचा सर्वाधिक आनंद आहे. शिक्षणाचा उचलेला हा वसा सर्व अडचणींवर मात करत असाच सुरु ठेवणार असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष रवींद्र शेट्ये यांनी केले.

व्यापारी पैसा फंड संस्थे तर्फे संगमेश्वर पंचक्रोशीतील ११ माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील दहावी आणि बारावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा आज आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रवींद्र शेट्ये हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून युयुत्सु आर्ते, संस्था सचिव धनंजय शेट्ये, सहसचिव अनिल शिंदे, सदस्य अभय गद्रे, अनिल शेट्ये, किशोर पाथरे, आरोग्य विभागाच्या श्रीमती श्रीमती रंजना कदम, सौ. दिप्ती गद्रे, शुभांगी शिंदे, मुख्याध्यापक बाळासाहेब चव्हाण, पर्यवेक्षक नेहा संसारे, ज्येष्ठ शिक्षक सुभाष पाटील, कालिदास मांगलेकर आदी उपस्थित होते.

प्रास्ताविकात मुख्याध्यापक बाळासाहेब चव्हाण यांनी, व्यापारी पैसा फंड संस्थेतर्फे सलग चौथ्या वर्षी पंचक्रोशीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आल्याचे नमूद केले. सुमारे १०० गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरवातुन अन्य विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेण्याचे आवाहन चव्हाण यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देवून गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे युयुत्सू आर्ते यावेळी बोलतांना म्हणाले की, गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि कौतुक करावे तेवढे थोडेच आहे मात्र त्याबरोबरच ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले आहेत त्यांनी खचून न जाता देशासाठी काही तरी वेगळं कार्य करण्याची गरज आहे, असे नमूद केले. क्रिडा, कला, सामाजिक आणि राजकीय अशा विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांनी आपले करीअर करणे ही काळाची गरज असल्याचे आर्ते यांनी आवर्जून नमूद केले.

व्यापारी पैसा फंड संस्थेचे अध्यक्ष रवींद्र शेट्ये हे अनेक संकटावर मात करत आज संस्थेचा कारभार आज उत्तुंग शिखरावर नेला आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या जिद्दीचा आदर्श घ्यावा. अभ्यासा व्यतिरिक्त असणारी अन्य क्षेत्र देखील समाजात तेवढीच प्रतिष्ठा आणि मानसन्मान मिळवून देतात, असे आर्ते यांनी शेवटी नमूद केले.

यावेळी सहसचिव अनिल शिंदे, पालकवर्गातर्फे दिप्ती गद्रे यांनी आपली मनोगतं व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अर्चिता कोकाटे यांनी, आभारप्रदर्शन पर्यवेक्षक नेहा संसारे यांनी तर कार्यक्रमाची सांगता वंदेमातरमने नंदकुमार वंजारे यांनी केली.