
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा तुटवडा पडू नये म्हणून सोशल डिस्टन्स पाळत रक्तदान करण्याचं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केल्यानंतर त्या आवाहनाला प्रतिसाद देत वाड्यातील तरुणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्याच्या लढाईत आम्हीही शासनाच्या बरोबर असल्याचे दाखवून दिले आहे.
राज्य सरकारच्या आवाहनानंतर वाड्यातील हिंगलाज माता मंदिर ट्रस्टच्या पुढाकाराने क्रांतिकारक शामजी कृष्णा वर्मा यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून वाड्यातील हिंगलाज माता मंदिर येथील सभागृहात रक्तकर्ण गृप, गवंडी मजूर कामगार संघटना आणि व्यापारी असोसिएशन या सामाजिक संस्थांच्या सहभागाने रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला वाड्यातील तरुणांनी भरभरून प्रतिसाद दिला असून सुमारे १०२ रक्तदात्यांनी रक्तदान करुन तरुणांना एक चांगला संदेश दिला असल्याचे हिंगलाज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष निखिल भानुशाली यांनी सांगितले तर या रक्तदान शिबिरासाठी आणखी शेकडो तरुणांनी नाव नोंदणी केली होती. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे मर्यादित १०२ रक्तदाते रक्तदान करु शकले मात्र लवकरच पुन्हा रक्तदान शिबिर आयोजित करणार असल्याचे रक्तकर्ण किरण थोरात यांनी सांगितले.


























































