
मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाडीबंदर यार्डमधील कामासाठी घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे शनिवारी रात्री उशिरा घरी जाणाऱ्या लोकल प्रवाशांची चांगलीच लटकंती झाली. रात्री 11 नंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून येणाऱ्या लोकल तब्बल पाऊण तास न आल्याने भायखळा, परळ, दादर स्थानकात मोठी गर्दी झाली होती.
सीएसएमटी-वाडीबंदर यार्डमधील रेल्वे मार्गिका सात आणि तीनला जोडण्यासाठी शनिवारी रात्री 11 ते रविवारी पहाटे 5 वाजेपर्यंत सहा तासांचा रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आला होता. त्यामुळे रात्री उशिराने सीएसएमटी स्थानकातून सुटणाऱ्या लोकल गाडय़ा विलंबाने धावत होत्या. परळ स्थानकात 11 नंतर सुमारे अर्धा-पाऊण तास एकही लोकल आली नाही. 11.45 वाजताची टिटवाळा लोकलही विलंबाने आल्याने स्थानकात गर्दी झाली होती. दरम्यान, विलंबाने धावणाऱ्या गाडय़ांबाबत रेल्वेकडून कोणतीच उद्घोषणा होत नसल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात होती.



























































