वाखरी-पंढरपूर पालखीमार्गासाठी 74 कोटींचा निधी, नितीन गडकरी यांची पंढरपुरात घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आळंदी-पंढरपूर व देहू-पंढरपूर या पालखीमार्गांचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, हे मार्ग वाखरीपासून बायपासमार्गे गुरसाळे, नारायण चिंचोली, मोहोळ, सोलापूरला जोडले आहेत. त्यामुळे वाखरी ते पंढरपूर या 8.4 किलोमीटर रस्त्याचे काम अधांतरी होते. वाखरी ते विठ्ठल मंदिरापर्यंतच्या या रस्त्याच्या कामासाठी 74 कोटींच्या निधीची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केली.

गेल्या काही वर्षांपासून आळंदी-पंढरपूर व देहू-पंढरपूर या पालखीमार्गांच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. या मार्गाच्या दोन्ही बाजूंनी सुलभ पथदिवे, वृक्षारोपण, सासवड, लोणंद, फलटण, नातेपुते, माळशिरस, पंढरपूर, बारामती, बावडा, अकलूज, श्रीपूर, बोरगाव येथे दाट लोकवस्तीच्या ठिकाणी बाह्यवळण घेऊन हा महामार्ग बनविण्यात येत आहे. या बाह्यवळणामुळे वाखरी ते पंढरपूर हा 8.4 किलोमीटरचा रस्ता वगळण्यात आला आहे. त्यामुळे मुख्य पालखीमार्गाचे रुंदीकरण, सुशोभीकरण करण्यात आले असले, तरी या मार्गाबाबत मात्र कसलाही आराखडा, निधीची घोषणा अद्यापि करण्यात आली नव्हती. त्यामुळे वारकऱयांसह स्थानिक नागरिकांमध्ये हा मार्ग पालखीमार्गात समाविष्ट करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार मंत्री नितीन गडकरी यांनी या मार्गासाठी तब्बल 74 कोटी रुपयांच्या सुधारित निधीची घोषणा केली आहे. त्यामुळे रखडलेला मार्ग आता मार्गी लागणार आहे. त्यामुळे पालखीतील वारकऱयांचा प्रवास आणखी सुखकर होणार असून, पंढरपूरच्या विकासात, वैभवात भर पडणार आहे.

रेल्वेपुलामध्ये आवश्यकतेनुसार बदल करणार

पंढरपूर-फलटण व टेंभुर्णी-पंढरपूर या मार्गाने पंढरपुरात येणाऱया मार्गांचे आता रुंदीकरण, सुशोभीकरण होत आहे. मात्र, येथून पुढे सरगम चौकातून शहरात येणाऱया मार्गाचे सुशोभीकरण करताना कायम अडसर ठरणारा सरगम चौकातील रेल्वेपूल कायम चर्चेत असतो. मात्र, वाखरी-पंढरपूर या मार्गाचे रुंदीकरण व सुशोभीकरण करताना हा रेल्वेपूल विचारात घेऊन सुशोभीकरण करण्यात येणार असल्याचे मंत्री नितीन गडकरी म्हणाले. त्यानुसार आवश्यकतेनुसार या रेल्वेपुलामध्ये बदल करण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. रेल्वेपुलाचेही काम आता मार्गी लागणार असल्याने वाहतुकीत सुलभता येणार आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंह यांनी सोमवारी पंढरपूर येथे श्री विठ्ठल आणि रुख्मिणीमातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.