वानखेडे नव्हे तर लॉर्ड्स, स्टेडियम आता पर्यटकांसाठी खुला होणार

जागतिक क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱया इंग्लंडमधील लॉर्डस् या ऐतिहासिक स्टेडियममध्ये पर्यटनास परवानगी देण्यात आलीय. आता मुंबईतील प्रतिष्ठेचे समजले जाणारे वानखेडे स्टेडियमही पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने हा ऐतिहासिक बदल घडून येणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. या महत्त्वाच्या निर्णयामुळे मुंबईतील वानखेडे स्टेडियमची कीर्ती जगभर पोहोचेल हे निश्चित.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार एमसीएमध्ये म्युझियम अर्थातच संग्रहालय तयार करण्यात येणार आहे. या दिशेने एमसीए पाऊल उचलत आहे. या संग्रहालयात मुंबई क्रिकेटशी निगडीत सर्व वस्तूंचा समावेश करण्यात येणार आहे. मुंबईने जगाला दिलेले दिग्गज फलंदाज, त्यांच्या आठवणी, लढतींची छायाचित्रे, वर्ल्ड कप फायनलशी संबंधित सर्व बाबी आदी गोष्टींमुळे याची शान आणखीनच वाढणार आहे.

ड्रेसिंग रूम, स्टॅण्ड, गॅलरी अन् सर्व काही

वानखेडे स्टेडियम पर्यटकांसाठी खुले करण्यात आल्यास यावेळी या स्टेडियममधील इतर महत्त्वाच्या वस्तू त्यांना दाखवण्यात येतील. यामध्ये खेळाडूंसाठी बनवण्यात आलेले ड्रेसिंग रूम, गॅलरी, स्टॅण्ड आदी गोष्टींचा समावेश आहे. यामुळे चाहत्यांची हे सर्व पाहण्यासाठी झुंबड उडेल. जागोजागी सेल्फी पॉइंटचा नजराणा पाहायला मिळेल.

तिकीट दराबाबत अद्याप चर्चा नाही

वानखेडे स्टेडियम पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे. याबाबत निर्णय झाला असला तरी तिकीट दराबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. तसेच कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतरच हे स्टेडियम पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे.

आपल्या येथे क्रिकेट हा खेळ धर्म म्हणून बघितला जातो. वानखेडे स्टेडियममध्ये हिंदुस्थानने वर्ल्ड कप जिंकलाय. त्यामुळे ही जागा पर्यटनासाठीच नव्हे तर क्रिकेट भक्तांसाठी, क्रिकेटपटूंसाठी महत्त्वाची आहे. –आदित्य ठाकरे, पर्यटन मंत्री

आपली प्रतिक्रिया द्या