
भारतीय हवामान खात्याकडून राज्यात पुढील 3 दिवसात म्हणजे दिनांक 9 जुलै ते 11 जुलै पर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार (64 ते 200 मिमी) पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कोकण विभागातील पालघर जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 66 मिमी. पाऊस झाला असून सद्यस्थितीत जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात असून जिल्ह्यातील तीन मुख्य नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत. जिल्ह्यात कोठेही पूरपरिस्थिती नसली तरी खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची एक तुकडी (एनडीआरएफ) तैनात करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 76.4 मिमी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात कुठेही पूर परिस्थिती नाही तसेच सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत. जिल्ह्यात सर्व प्रकारची वाहतूक सुरळीत सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) च्या दोन टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
मुंबई गेल्या 24 तासात कुलाबा येथे 52.8 मिमी तर सांताक्रूझ येथे 49.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र अद्याप सर्व प्रकारची वाहतूक सुरळीत असल्याबाबत बीएमसी नियंत्रण कक्षाने कळवले आहे. मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे. मुंबईमध्ये एनडीआरएफच्या एकूण 5 टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 77.9 मिमी. पाऊस झाला आहे जिल्ह्यात कुठेही पूर परिस्थिती नाही तसेच कुंडलिका नदी इशारा पातळीवर वाहत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील दरड प्रवण व पूरप्रवण भागातील 1968 कुटुंब म्हणजे एकूण 3649 व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 11 घरांचे अंशतः नुकसान झाले आहे; तसेच 5 घरांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात एनडीआरएफ टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 24 तासात 71.5 मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली असून सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही मात्र जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदी व राजापूर तालुक्यातील कोदवली नदी इशारा पातळीवरून वाहत आहेत. सदर भागातील नागरिकांचे आवश्यकतेनुसार स्थलांतर करण्यात येत असून नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या असून जिल्हा प्रशासन सतर्क आहे. तसेच दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीकरिता 9 जुलै 2022 पर्यंत बंद करण्यात आला आहे व वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. दरड प्रवण व पूरप्रवण भागातील 288 कुटुंब म्हणजे एकूण 965 व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 120 घरांचे अंशतः नुकसान झाले आहे, तसेच 6 घरांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात दोन एनडीआरएफ च्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 24 तासात 127 मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली असून कुठेही पूर परिस्थिती नाही तसेच सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात एक एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहेत, पुणे विभागात पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यातील परिस्थिती सामान्य असून जिल्ह्यात कुठेही पूर परिस्थिती नाही, तसेच सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत असून सर्व प्रकारची वाहतूक सुरळीत सुरू आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 19 मिमी. पाऊस झाला असून, सद्यस्थितीमध्ये पूर परिस्थिती नाही. पंचगंगा नदीची सध्याची पाणी पातळी 39.6 फूट असून इशारा पातळी 39 फूट एवढी आहे. पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता एनडीआरएफ च्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस सुरू असून मंत्रालय नियंत्रण कक्ष राज्यातील सर्व जिल्हा नियंत्रण कक्षांच्या सातत्याने संपर्कात आहे. पूर परिस्थिती बाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफच्या तुकड्या पूर प्रवण जिल्ह्यांमध्ये या आधीच तैनात केल्या आहेत.
राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या 15 तुकड्या तैनात
राज्यातील पूर परिस्थितीबाबत उपाय योजना म्हणून प्रशासनातर्फे राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या पूर प्रवण जिल्ह्यांमध्ये या आधीच 15 तुकड्या तैनात केल्या आहेत. मुंबई -3, पुणे-1, नागपूर-1 अशा एकूण 5 राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), तसेच धुळे-2, नागपूर-2 अशा एकूण 4 टीम राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या कायमस्वरूपी तुकड्या आहेत.


























































