टाकाऊ काळ्या तेलाचा काळाबाजार करणारी चोकडी गजाआड, तेलाने भरलेले दीडशे ड्रम जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कंपन्यांमधील टाकावू काळे तेलाची विल्हेवाट न लावता त्या तेलावर बेकायदेशीपणे रासायनिक प्रक्रिया करून ते तेल पुन्हा बाजारात विकणाऱ्या तसेच या प्रक्रियेत शिल्लक राहणारे तेल खाडी सोडून पर्यावरणाचा ऱ्हास करणारी टोळी गुन्हे शाखेच्या युनिट-4 ने गजाआड केले. आरोपींनी मानखुर्दच्या मंडाळा परिसरात साठवून ठेवलेला 39 हजार लिटर टाकाऊ काळ्या तेलाचा साठा जप्त केला.

मानखुर्दच्या मंडाळा खाडीलगत असलेल्या मोकळ्या जागेत बेकायदेशीरपणे टाकाऊ काळ्या तेलाने भरलेले शेकडो ड्रम आहेत. त्या तेलावर रासायनिक प्रक्रिया करून मग ते तेल पुन्हा बाजारात विकले जात असून उर्वरित तेल खाडीत सोडले जात असल्याची माहिती युनिट-4 ला मिळाली. त्यानुसार प्रभारी पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांच्या नेतृत्वाखाली एपीआय विनोद माळवे, राजेश पाटील तसेच दयानंद कांबळे, कृष्णा नार्वेकर, सुनिल साळोखे, संदिप कांबळे, संदिप तळेकर, अजय बल्लाळ व पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला.

त्यावेळी तेथे टाकाऊ काळ्या तेलाने भरलेले दीडशे ड्रम तसेच 100 मोकळे ड्रम मिळून आले. पोलिसांनी दीडशे ड्रम मध्ये भरलेले पावणे दहा लाख किमतीचे 39 हजार लिटर काळे तेल जप्त करण्यात आले. तसेच काळ्या तेलाचा गोरखधंदा करणाऱ्या मोहमद खलील इद्रीसी, मोहमद अफजल मोहमद अली खान, इरफान मोहमद सईद मसुरी, स्वामीनारायण फुरसत डोसाड अशा चौघांना अटक केली. या गुन्ह्याचा पुढील तपास मानखुर्द पोलीस करीत आहेत.