उजनी धरणात पाणीसाठ्यात वाढ; मंगळवारी पाणीसाठा प्लसमध्ये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेवटच्या टप्प्यात संथ गतीने का होईना मंगळवारी रात्री 9 वाजता उजनी धरणाने मायनसचा विळखा तोडून प्लसमध्ये प्रवेश केला. त्यात विशेष म्हणजे गतवर्षीप्रमाणे जुलै महिन्यात उजनीने प्लसमध्ये प्रवेश केल्याने उजनी धरण 100 टक्के भरण्याची आशा पल्लवित झाल्या आहेत.

उजनी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने हजेरी लावल्याने उजनी धरणावर अवलंबून असणाऱया शेतकऱयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पहिल्यांदाच चालू पावसाळी हंगामात उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या धरणसाखळीत काल एका दिवसात 1629 मि.मी. तर, उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 6 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र, उजनीत समाधानकारक वाढ झालेली नसल्याने शेतकऱयांमध्ये निर्माण झालेले चिंतेचे वातावरण हळूहळू निवळू लागले आहे. वरील 19 धरणांच्या पाणलोटात मोठा पाऊस चालू आहे. त्यामुळे वडज धरणातून 235, कलमोडीतून 4499, खडकवासल्यातून 13,142 क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

उजनीचे अधीक्षक अभियंता व टीम व उजनी प्रशासनाकडून झालेल्या नियोजनामुळे उजनी धरणाची पाणी पातळी केवळ उणे 12.42 टक्क्यांपर्यंतच खाली गेली होती. चालूवर्षी पुणे जिह्यातील इंदापूर, दौंड तसेच नगर जिह्यातील कर्जत व सोलापूर जिह्यातील करमाळा तालुक्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने उजनीतून सिंचनासाठी होणारा पाणीउपसा बंद आहे.

उजनीतील पाणीपातळी (मंगळवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत)

एकूण पाणीपातळीः 490.990 मीटर

एकूण पाणीसाठाः 1794.93 दलघमी (63.38 टीएमसी)

उपयुक्त साठाः प्लस 7.52 दलघमी

उपयुक्त साठाः 0.28 टी.एम.सी.

टक्केवारीः प्लस 0.07 टक्के

आवकः दौंडः 43,150 क्युसेक

बंडगार्डनः 25,218 क्युसेक