
सामना प्रतिनिधी । संगमेश्वर
संगमेश्वर तालुक्यातील गडनदी धरणात सध्या ६४ द.ल.घ.मी पाणी साठा उपलब्ध होता. मात्र धरणाच्या सेवाद्वाराचे काम करायचे असल्याने सेवाद्वारातून प्रती सेकंद १४४ क्युसेकने पाणी नदीपात्रात जाण्यास सुरुवात झाली आहे नदीपात्रातील पाण्यात काही अंशी वाढ झाली आहे.
नदीपात्राच्या पाण्यात वाढ होताच पाटबंधारे विभागाने नदी किनारी गावांना सतर्कतेच्या सुचना जारी केल्या आहेत. शेतकरी वर्गाने नदीपात्रात उतरु नये व स्वतःसह जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर गोडबोले यांनी केले आहे.
यांत्रिकी विभागाची कामगिरी
गडनदी धरणाच्या सेवाद्वाराचे काम २००९ पुर्वी केले होते मात्र नंतरच्या काळात सेवाद्वार उघडले गेले नसल्याने सेवाद्वार उघडण्यास अडथळे येत होते. कोणताच सेवा द्वार तोडावे अशी परिस्थिती निर्माण झाली असताना यांत्रिकी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत सेवा द्वार खुले केले. जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी कर्मचाऱ्यांनी चांगली कामगिरी केल्यामुळे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर गोडबोले यांनी त्यांच्या कार्याची दखल घेत कौतुक केले.





























































