
सामना प्रतिनिधी । देवरुख
संगमेश्वर तालुक्यातील २३३ पाणी नमुने तपासणीसाठी जिल्हा प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. याचा अहवाल नुकताच पंचायत समिती आरोग्य विभागाला प्राप्त झाला आहे. २३३ पैकी ९ पाणी नमुने दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दूषित पाण्यामुळे विविध आजार बळावतात. ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासनही प्रयत्नशील असते. संगमेश्वर तालुक्यात ११ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. यामध्ये बुरंबी , देवळे , धामापूर , कडवई , माखजन , कोंडउमरे , निवेखुर्द , फुणगूस , सायले आणि वांद्री यांचा समावेश आहे. खबरदारी म्हणून या प्राथमिक आरोग्य केंद्रातील सार्वजनिक ठिकाणाचे पाणी नमुने दर महिन्याला एकत्रित केले जातात. हे पाणी नमुने तपासणीसाठी जिल्हा प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येतात. तालुक्यातून पाठविण्यात आलेल्या २३३ पाणी नमुन्यांचा अहवाल नुकताच आरोग्य विभागाला प्राप्त झाला आहे.
यातील ९ पाणी नमुने दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात देवळे ३० पैकी ३ , सायले ११ पैकी ३ , वांद्री २६ पैकी ३ अशा पाणी नमुन्यांचा समावेश आहे. बुरंबी १४ , धामापूर् १७ , कडवई १० , माखजन ३७ , कोंड उमरे १४ , निवेखुर्द २३ , फुणगूस २६ आणि साखरपा येथून २५ पाणी नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. या ठिकाणचे पाणी पिण्यास योग्य असल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे.































































