
सांगली जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरविल्याने दुष्काळी तालुक्यांमध्ये पाण्याची टंचाई प्रचंड जाणवू लागली आहे. जत आणि आटपाडी तालुक्यांतील 53 गावे आणि 392 वाडय़ावस्त्यांना टंचाईची झळ बसू लागली आहे. सद्यःस्थितीत सुमारे सव्वा लाख लोकसंख्येला 53 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
यंदा सांगली जिह्यात पावसाने मोठी ओढ दिली. गेली चार वर्षे जिह्याला पाण्याची टंचाई भासली नव्हती. पण चालू वर्षातील जून ते सप्टेंबर या कालावधीत जिह्यात सरासरीच्या 68 टक्केच पाऊस झाला. त्यामुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. दिवाळीत झालेल्या अवकाळी पावसाने रब्बीला जीवदान दिले. पिके वाचली; पण पिण्याच्या पाण्यासाठी या पावसाचा उपयोग झाला नाही.
राज्यात सर्वांत कमी पाऊस झालेल्या जिह्यांमध्ये सांगलीचा समावेश आहे. दुष्काळी जत आणि आटपाडी तालुक्यातील गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. खानापूर आणि कवठेमहांकाळ तालुक्यांतही टंचाई जाणवू लागली आहे. आजमितीस जत आणि आटपाडी या दोन्ही तालुक्यांत मिळून 53 गावांना 53 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये जत तालुक्यातील 50, तर आटपाडी तालुक्यातील तीन गावांचा समावेश आहे.
कवठेमहांकाळ तालुक्यातील एक आणि खानापूर तालुक्यातील तीन गावांतही पाणीटंचाई आहे; पण तेथे अद्याप टँकरने पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. जत तालुक्यातील एक लाख 19 हजार 921 लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. अजून मार्च, एप्रिल आणि मे या पुढील तीन महिन्यांमध्ये पाण्याची प्रचंड टंचाई वाढणार आहे. त्यामुळे जत, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर या तालुक्यांमध्ये पशुधनासह माणसांना पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. जत आणि आटपाटी या तालुक्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर पशुधन आहे. या तालुक्यात मेंढय़ा, शेळी पालनासह गायवर्गीय प्राण्यांसाठी चाऱयाची उपलब्धता हा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.
टँकर सुरू असलेली गावे
जत तालुक्यातील निगडी खुर्द, शेडय़ाळ, पांढरेवाडी, वळसंग, एकुंडी, हळ्ळी, बसर्गी, सालेगिरी, पाच्छापूर, कुडनूर, वायफळ, गुगवाड, गिरगाव 1, जाडरबोबलाद, काराजनगी, बेळोंडगी, मोकाशेवाडी, टोणेवाडी, सोनलगी, मुचंडी, जालीहाळ खुर्द, कागनरी, दरीबडची, कोळेगिरी, कोंत्येवबोबलाद, लमाणतांडा (दरीबडची), केरेवाडी (कोंत्येवबोबलाद), व्हसपेठ, खैराव, खंडनाळ, गुलगुंजनाळ, करेवाडी (तिकोंडी), दरीकोन्नूर, सिद्धनाथ, सुसलाद, पांडोझरी, सोरडी, खोजानवाडी, तिल्याळ, गोंधळेवाडी, अंकलगी, मोटेवाडी, भिवर्गी, मल्याळ.





























































